रेल्वे स्थानक परिसरात पादचाऱ्यांना चालणे कठीण

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथ व्यापले आहेत. सकाळ, संध्याकाळ स्थानकातून ये-जा करणाऱ्या नोकरदार व व्यापाऱ्यांनी चालायचे कुठून अशी तक्रार करायला सुरुवात केली आहे.

नवी मुंबई शहरातही आतापर्यंत शहरात फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक पथकातील व्यक्तींना अनेकदा मारहाणीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.  शहरातील ८ विभागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले पाहायला मिळते. पालिकेचे फेरीवाला धोरण अद्याप पूर्णत्वास आले नसून शहरात फक्त २,१३८ परवानाधारक फेरीवाले आहेत. तर त्याच्या कित्येक पट बेकायदा फेरीवाले शहरात व्यवसाय करताना पाहायला मिळतात.

बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या सर्वच विभागात विशेषत: रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर अधिक आहे. शहरात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विभाग कार्यालयाअंतर्गत कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी या पथकाबरोबर सुरक्षारक्षकही नेमलेले असतात. त्यांच्या संरक्षणात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. पण कारवाई करण्यासाठी पालिकेची गाडी येणार याची माहिती फेरीवाल्यांना अगोदरच मिळते. त्यामुळे शहरभर विविध भागात फेरीवाले पाहायला मिळतात.

नेरुळ, सीवूड्स, वाशी कोपरखैरणेसह विविध विभागात फेरीवाल्यांनी पदपथ व रस्ता आपलाच असल्यासारखे वर्तन करू लागले आहेत. त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांना विचारणा केली तर याबाबत नागरिकांनाच दमदाटी देत नागरिकांवरच शिरजोरी करत असल्याचे दिसून येत आहेत. नेरुळ, वाशी, कोपरखैरणे विभागात तर अनेक परिसर फेरीवाल्यांची ठिकाणे बनलेली आहेत.

फेरीवाल्यांची स्थिती

  • परवानाधारक फेरीवाले : २,१३८
  • नोंदणी प्रक्रियेत असलेले फेरीवाले: ७,३२५
  • बेकायदा फेरीवाल्यांची संख्या परवानाधारकांपेक्षा पाच पट असल्याचे चित्र आहे.

शहरात फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. नेरुळ विभागात कारवाई सातत्याने केली जाते. नेरुळ, जुईनगर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल.

भरत धांडे, विभाग अधिकारी, नेरुळ.