उरण : गेल्या आठवडय़ात नवी मुंबईतील पावणे औद्योगिक विभागात लागलेल्या आगीचा भडका उडून येथील रसायनिक कंपन्यातील संपूर्ण परिसराला याचा फटका बसला. अग्नी सुरक्षेच्या त्रुटीमुळे ही आग पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईतील रसायनांपेक्षा अधिकचा तेल व अतिज्वलनशील पदार्थाचा साठा उरणमध्ये असून अशा प्रकारच्या आगीच्या घटना उरणमध्येही घडल्या आहेत. त्यामुळे उरणमधील अग्नी सुरक्षा व त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली जात आहे.
उरणच्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर ओएनजीसी हा देशातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पात पेट्रोल, डिझेल, वायू तसेच नाफ्तासारखे अतिज्वलनशील पदार्थाची लाखो मेट्रीक लिटरची साठवणूक व वाहिन्यांमार्फत वाहतूकही केली जात आहे. त्यासाठी उरणमधील अनेक भागांतून या तेल व तेलजन्य पदार्थ वाहतूक करणाऱ्या जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या तेल व तेलजन्य पदार्थाच्या वाहिन्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आगीचा धोका आहे.
अशाच प्रकारे घरगुती वापराच्या वायूचीही साठवणूक केली जात आहे. तसेच वायू वाहून नेला जात आहे. जेएनपीटी बंदरातून दररोज लाखो मेट्रिक टन वायू व तेलजन्य पदार्थ आयात करून त्याचीही साठवणूक उरण तालुक्यातील विविध विभागांत साठवणूक केली जात आहे. त्याचप्रमाणे उरणमधील अनेक गोदामांतून नवी मुंबईतील कंपन्यांप्रमाणे घातक अशा रसायनांची साठवणूक व वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारच्या रसायनांमुळे गोदामांना आग लागल्याच्या घटना उरणमध्ये घडल्या आहेत. या आगीमध्ये २०११ मध्ये कामगारांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना याचा फटका बसला आहे. तर ओएनजीसीमध्ये साध्या चुकीमुळे अनेकदा आग लागून जीवितहानीही झाली आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी अग्नी सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उरणमधील तेलजन्य पदार्थ व अतिज्वलनशील पदार्थ साठवणूक करण्यात येत असलेल्या प्रकल्पात अग्निरोधक यंत्रणा असून त्याची प्रात्यक्षिके केली जातात. त्याचप्रमाणे गोदामांना परवानगी दिली जात असतानाच अग्निरोधक यंत्रणा तपासून स्थानिक अग्निशमन विभागाकडून तपासणी केला जातो. – भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strengthen fire safety uran fear fire transportation stocks chemicals oil amy
First published on: 12-05-2022 at 00:08 IST