scorecardresearch

आदीवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘चिखलवाट’ ; चिरनेरच्या केळय़ाचा माळ आदिवासी पाडयावरील रस्त्याकडे दुर्लक्ष

आदिवासी पाडय़ाला चिरनरे गावातून जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून याच मार्गाने पाडय़ावरील विद्यार्थी दररोज प्रवास करीत आहेत.

आदीवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘चिखलवाट’ ; चिरनेरच्या केळय़ाचा माळ आदिवासी पाडयावरील रस्त्याकडे दुर्लक्ष
आदिवासी पाडय़ावरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटरची वाट चिखल तुडवत जावे लागत आहे.

उरण : शहरातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने सक्षम नसली तरी आपण त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करीत असतो. मात्र आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेचे सोडा त्यांना धड शाळेत जाण्यासाठी असलेली वाटही सुस्थितीत नाही. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळय़ाचा माळ या आदिवासी पाडय़ावरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटरची वाट चिखल तुडवत जावे लागत आहे.

या आदिवासी पाडय़ाला चिरनरे गावातून जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून याच मार्गाने पाडय़ावरील विद्यार्थी दररोज प्रवास करीत आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असताना निधीचे कारण पुढे करीत जिल्हा परिषद प्रशासन त्यांचा रस्ता बनवत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षे साजरे केले जात असताना उरणमधील आदिवासी पाडे आजही रस्त्याच्यां प्रतीक्षेत आहेत. चिरनेरसारख्या ऐतिहासिक गावातील आदिवासी पाडय़ावर ही स्थिती तर इतर पाडय़ांची काय अवस्था असेल असा प्रश्न विचारला जात आहे. 

चिरनेर हे इंग्रज राजवटीविरुद्ध १९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहाच्या लढय़ाचे गाव आहे. या स्वातंत्र्यलढय़ात आठ शूरवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यात नाग्या कातकरी हा कातकरी आदिवासी तरुणही होता. मात्र त्याच्या वारसांना  स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही शिक्षणासाठी असा संघर्ष करावा लागत आहे. केळय़ाचा माळ या आदिवासी वाडीवरील मुलांना आपल्या माध्यमिक शिक्षणासाठी दगड, मातीच्या रस्त्यातून चिखल तुडवीत रोज सुमारे तीन किलो-मीटरची पायपीट करावी लागत आहे.  

चिरनेर गाव ते केळाचा  माळ आदिवासी वाडीपर्यंतच्या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून सुमारे तेरा लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र या रस्त्याचे काम  होऊ शकले नाही. याबाबत आदिवासी समाजाने  वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला आहे.

अर्धा तासाची बिकट वाट

आम्हाला पहाटे पाच वाजता उठून सात वाजता शाळेत यावे लागते. त्यासाठी केळीचा माळ ते चिरनेर हा अर्धा तासाचा चालत प्रवास करावा लागतो. मात्र निम्यापेक्षा अधिक रस्ता चिखलाचा असल्याने चिखलाने माखलेले पाय व कपडय़ावरील डाग पडलेले असतात. पायांनाही जखमा होत असल्याच्या भावना विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

केळय़ाचा माळ आदिवासी वाडी रस्त्यासाठी जिल्हा परिषदेचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आहे, मात्र हा निधी ग्रामपंचायतीकडे आलेला नाही. तो येताच रस्त्याची दुरुस्ती केली जाईल.

महेश पवार, ग्रामविकास अधिकारी, चिरनेर ग्रामपंचायत

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students from adivasi pada walk three kilometers through mud to go to school zws