राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची टीका

राज्यात सवंग घोषणा देत सत्तेत आलेल्या सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे केली.

उरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.  ते म्हणाले की राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर त्यांचे आरक्षण अद्याप सरकारला जाहीर करता आलेले नाही.

नगरपालिका, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यात कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उरणमध्ये तालुकास्तरीय मेळावा झाला. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसशी आघाडी करून निवडणुका लढण्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले. तर उरणमध्ये शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांनी केलेल्या आघाडीची सत्ता येईल असा विश्वासही व्यक्त केला. मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांचीही भाषणे झाली.

आणीबाणीला विरोध करणारा भाजप सत्तेत आला आहे. आता त्यांचे नेते घाबरू लागले आहेत. त्यामुळेच अभिव्यक्ती व स्वातंत्र्य हिरावून घेणारा अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या कायद्याला राष्ट्रवादी तीव्र विरोध राहील, असेही ते  म्हणाले.