हिरानंदानी रुग्णालयाचा भाडेपट्टा संशयाच्या भोवऱ्यात

नवी मुंबई पालिकेने सर्वप्रथम सार्वजनिक वापरासाठी सिडकोकडे भूखंड मागणी केली.

नवी मुंबई पालिकेने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाचा ‘हिरानंदानी हेल्थ केअर’ला दिलेला पश्चिम भागाचा भाडेपट्टा संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दहा वर्षांपूर्वी केवळ तीन रुपये ७५ पैसे प्रति चौरस फूट दाराने एक लाख २० हजार चौरस फूट क्षेत्रफळ देण्यात आले आहे. त्या वेळी या भागातील बाजारभाव हा ६० ते १०० रुपये प्रति चौरस फूट असा होता. याच बदल्यात पालिकेला दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. सिडकोकडून सवलतीच्या दरात भूखंड घेऊन फायदा कमावणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पालिका आणि हिरानंदानी यांच्यातील साटेलोटे राज्य सरकारच्या निर्देशनास आणले आहेत.
जानेवारी १९९२ रोजी स्थापन झालेल्या नवी मुंबई पालिकेने सर्वप्रथम सार्वजनिक वापरासाठी सिडकोकडे भूखंड मागणी केली. त्यानुसार सिडकोने वाशी सेक्टर दहा अ येथील दहा हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा भूखंड पालिकेला सार्वजनिक रुग्णालय उभारण्यासाठी दिला. पालिकेने सप्टेंबर १९९७ रोजी सिडकोबरोबर करारनामा करून या भूखंडावर पाच मजली इमारत बांधली. त्यानंतर नऊ वर्षांनंतर या इमारतीतील सव्वा लाख चौरस फूट क्षेत्रफळ वापरविना पडून असल्याने जानेवारी २००६ रोजी हिरानंदानी हेल्थ केअर या रुग्णालयाला भाडेपट्टय़ावर देण्यात आले. हा भाडेपट्टा अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. शहरातील भाजी व मासळी बाजारातील ओटेदेखील एक रुपयापेक्षा जास्त प्रति चौरस फूट दराने देणाऱ्या पालिकेने या इमारतीतील एक लाख वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम हे केवळ तीन रुपये ७५ पैसे इतक्या फुटकळ दरात दिले. त्याच वेळी सेक्टर दहा आणि वाशीतील दर हा ६० ते १०० रुपये प्रति चौरस फूट होता. त्यामुळे पालिका हिरानंदानीवर फार उदार असल्याचे दिसून आले. त्यानंतर हा दर फारच कमी लावल्याचा साक्षात्कार पालिकेला झाला आणि त्यांनी डिसेंबर २००८ रोजी चार रुपये २५ पैसे आकारण्यात आला.
हा सर्व करारनामा २५ वर्षांकरिता असून दरवर्षी या भाडेपट्टय़ातील वाढ ही केवळ प्रथम एक टक्का आणि नंतर दोन टक्के करण्यात आली आहे. सर्वसाधारण भाडेपट्टय़ावर देण्यात आलेले गाळे किंवा घरांची दरवर्षी होणारी वाढ ही दहा ते १५ टक्के आहे पण पालिकेने हिरानंदानीवर केवळ एक किंवा दोन टक्के वाढ करून मेहेरनजर केली आहे. या सर्व सवलतीच्या बदल्यात पालिका शिफारस करेल त्या रुग्णांना मोफत उपचार करण्याचा करार करण्यात आला आहे.
हिरानंदानीने मुंबई उच्च न्यायालयात नुकताच एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात गेल्या दहा वर्षांत ३१ कोटी ६३ लाख ७३ हजार ३७ रुपयांची रुग्णांना उपचारात सवलत दिल्याचा दावा केला आहे. यात हिरानंदानीने आपल्या नावलौकिकाला साजेसा अवास्तव खर्च जोडला असून तो ४७ कोटी ६७ लाख आहे. त्यावर ठाकूर यांनी शासनाला लिहिलेल्या पत्रात जोडलेले विवरण पत्र नागरिकांना विचार करायला लावणारे आहे. पालिकेने हिरानंदानीला चार रुपये २५ दराने एक लाख वीस हजार क्षेत्रफळ दिले आहे. त्याऐवजी हा भाडेपट्टा ५५ रुपये प्रति चौरस फूटने देण्यात आला असता तर एक लाख वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे मासिक भाडे ६६ लाख रुपये होत असून ते वर्षांला सात कोटी ९२ लाखांच्या घरात जात आहे. याचा अर्थ दहा वर्षांत ही रक्कम सुमारे ८० कोटींच्या जवळपास जात असून हिरानंदानीने त्यांच्या हिशोबाने लावलेला रुग्ण उपचार खर्च हा केवळ ४७ कोटी आहे. तो दहा वर्षांच्या भाडय़ापेक्षा कमी आहे.
पालिका व हिरानंदानीने नागरिकांच्या डोळ्यात केलेली ही धूळफेक ठाकूर यांनी उजेडात आणली असून शासनाकडे त्याचा पत्रव्यवहार केला आहे. त्यात भाडेपट्टय़ामध्ये होणारी वर्षांची दरवाढ ही हास्यास्पद बाब असून एक ते दोन टक्क्यात शासनाने भाडय़ाने घेतलेल्या जागांमध्येही होत नसल्याचे आढळून आले आहे. पालिकेला वीस वर्षांपूर्वी देण्यात आलेली ही जागा अटी व शर्तीचा भंग केल्याने काढून घेण्याची नोटीस सिडकोने जानेवारीत दिली असून दोन शासकीय संस्था आणि रुग्णांचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. शासन याबाबत निर्णय घेताना या भाडेपट्टय़ाच्या दखल घेईल, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

वाशी येथील हिरानंदानी रुग्णालयाच्या मुळाशी अनेक सुरस कथा दडल्या आहेत. दीडशे रुग्णालयीन खाटा असल्याचे सांगून केवळ १४५ खाटा असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांना आढळून आल्याने ह्य़ा रुग्णालयाचा परवाना नर्सिग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट २००५ नुसार एप्रिल २०१२ रोजी रद्द करण्यात आला होता. त्या विरोधात रुग्णालय मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी अंतरिम स्थगिती आणली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही एक प्रतिज्ञापत्राद्वारे परवाना रद्दच्या नोटीसचे समर्थन केले. त्यानंतर काय सूत्र फिरली हे कोणालच माहीत नाही, पण जुलै २०१५ रोजी ज्या पालिकेने या रुग्णालयाचा परवाना रद्द केला होता त्याच पालिकेने न्यायालयातून माघार घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suspicion about hiranandani healthcare