बाजारात उत्साह; मिठाई, दागिने विक्रेत्यांसह मॉल व्यावसायिकांत समाधान

नवी मुंबई  : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारातील ‘गोडवा’ गेल्या वर्षीपेक्षा काही प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत शुक्रवारी मिठाईच्या दुकानासह खरेदीसाठी नागरिक बाहेर पडल्याचे चित्र होते. सोनेखरेदीसाठीही प्रतिसाद मिळाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तर मॉलमध्ये वाढलेल्या गर्दीमुळे मॉल व्यावसायिक समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.  वाहन विक्रीला मात्र ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

करोनामुळे मागील वर्षी शासनाने टाळेबंदी जाहीर केली होती. त्यामुळे सर्वच सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले.  या वर्षी करोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली. सण-उत्सवाच्या कालावधीत दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. विविध सवलतीही जाहीर केल्या, तर ग्राहकांना दुकानात आल्यावर प्रसन्न वाटावे यासाठी आकर्षित अशी सजावट करण्यात आली होती.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहन खरेदीला प्राधान्य दिले जाते. गतवर्षीपेक्षा आज दसऱ्यानिमित्त सोने खरेदीला चांगला उत्साह होता. नागरिक सकाळपासूनच सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी येत होते. त्यामुळे समाधानकारक विक्री झाल्याचे चित्र होते.  हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे, असे वाशीतील वामन हरी पेठेचे व्यवस्थापक अशोक गावंड यांनी सांगितले.

तर मॉलमध्ये खरेदीसाठी चांगला प्रतिसाद होता. दिवसाला ५ ते ७ हजार लोक मॉलमध्ये येत असून आज १२ ते १३ हजार नागरिक आले होते, असे रघुलीला मॉलचे संदीप देशमुख यांनी सांगितले.

मिठाई खरेदीसाठी गर्दी

मिठाई खरेदीसाठी शहरातील दुकानांत गर्दी होती. दिवसभरात या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल झाली. मिठाई खरेदीसाठी नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता. गेल्या वर्षी टाळेबंदी असल्याने मोठी कठीण परिस्थिती होती. आता मात्र नागरिक सणासुदीबरोबरच इतर दिवशीही मिठाई खरेदीसाठी येत आहेत, असे सीवूड्स येथील झामा मिठाई या दुकानदाराने सांगितले.

फुलांची चांगली विक्री

फुलांची विक्रीही चांगली झाली. बाजारात झेंडू १०० ते २०० रुपये प्रतिकिलोने विकला गेला. या वर्षी गतवर्षीपेक्षा थोडा अधिक व्यवसाय झाला. तर सोन्याची पाने (आपट्याची) एक पेंढी ३० ते ५० रुपयाला विकल्याचे फूलविक्रेते धर्मेद्र राजभट यांनी सांगितले.