पनवेल : करोना रुग्णसंख्या पनवेल परिसरात आटोक्यात आली असली तरी साथीचे आजार बळावल्याने चिंता वाढली आहे. खारघरमध्ये एक स्वाइन फ्ल्यूचा रुग्ण सापडला असून त्याची प्रकृती बरी आहे. तर कामोठेत मंकीफॉक्स आजाराचा एक संशयित रुग्ण आहे. डेंग्यूचेही सहा रुग्ण आठवडाभरात सापडले आहेत.

पनवेलमध्ये सध्या करोनची रुग्णसंख्या घटली असून दैनंदिन १० पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत, तर शहरात करोनाचे उपचाराधीन रुग्ण शंभरच्या घरात आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. करोनाबाबत सध्या दिलासा मिळत असला तरी साथीचे वाढते आजार चिंतेचे कारण बनले आहे.
खारघरमधील केसर हारमोनी या इमारतीमध्ये चार जणांच्या कुटुंबात राहणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीला स्वाइन फ्ल्यू संशयित असल्याने त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. २७ जुलैला याबाबत वैद्यकीय अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णालय प्रशासनाने याबाबत पनवेल पालिकेला माहिती दिली. त्यानंतर पालिकेचे वैद्यकीय पथक त्या रुग्णाच्या घरी जाऊन कुटुंबातील इतर सदस्यांचे नमुने घेतले असून त्यांना स्वाइन फ्ल्यूचा लागण झालेली नाही. तसेच या रुग्णाची प्रकृतीही बरी असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.

कामोठे वसाहतीमध्ये एका व्यक्तीला मंकीफॉक्स या रोगाची लक्षणे असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला बुधवारी दुपारी मिळाली होती. यानंतर पालिकेने संबंधिताच्या घरी खात्री करण्यासाठी वैद्यकीय पथक पाठविले असून त्याचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल काय येतो याची प्रतीक्षा असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
गर्दीत जाणे टाळणे, हात स्वच्छ ठेवणे व मुखपट्टीचा नियमित वापर केल्यास साथरोग टाळता येतील. पावसाळ्यात परिसरात अस्वच्छता असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मलेरिया रुग्णही वाढले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच डेंग्यूचे आठवडाभरात सहा रुग्ण पनवेल पालिका क्षेत्रात सापडले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

गर्दीत जाणे टाळा, स्वत:सोबत परिसर स्वच्छ ठेवा आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास साथरोग टाळता येऊ शकतील.– डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका