तळवली

तळवली. शांत, संयमी गाव. रबाळे रेल्वे स्थानकापासून एक आणि ठाणे-बेलापूर मार्गापासून पाऊण किलोमीटरवरील हे गाव ठाणे खाडीतील एका भव्य खडकावर वसले गेले आहे. त्यामुळे खडकावरचे गाव म्हणूनही या गावाची ओळख आहे. गावाच्या तीन बाजूंनी शेती आणि एका बाजूने खाडीकिनारा यामुळे या गावातील सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणे एक विलोभनीय दृश्य होते. सरकारने तंटामुक्त गावाच्या योजना अलीकडे लागू केल्या; पण तळवलीत तंटामुक्त गावाचा इतिहास शंभर वर्षांपेक्षा जुना आहे.

Departure of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony on 29th June
पुणे : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
khajina vihir Vitthal temple
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी

ठाणे-बेलापूर पट्टीतील सर्वात मोठे गाव असलेल्या घणसोली गावाच्या दक्षिण बाजूस आणि गोठवली गावाच्या उत्तर बाजूस असलेले हे तळवली गाव म्हणजे एक चिमुकले बेटच होते. दहा-बारा कोळी कुटुंबांची वसाहत या बेटावर होती. पेशवाईतील चिमाजी अप्पा यांची स्वारी समुद्राकडे जाताना काही काळ या तळवली गावाजवळ त्यांचा पडाव पडल्याची नोंद आहे. चिमाजी अप्पा यांच्या स्वारीतील सैनिकांनी त्यांच्या पूजेसाठी कापरी देवाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. या मंदिराच्या आजूबाजूला आता मोठय़ा प्रमाणात चाळींची बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे मंदिराच्या चारही बाजूने नागरीकरण झाल्याचे दिसून येते, मात्र ८० वर्षांपूर्वी या मंदिरापर्यंत पाणी होते. कापरी देवाचा आता रहिवाशांनी कापरी बाबा केला आहे; पण या उघडय़ावर असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केला; पण तो यशस्वी झाला नाही म्हणून आजही हे मंदिर विनाछत व भिंतीचे आहे.

गावात या मंदिराबरोबरच श्री राम, श्री हनुमान, श्री म्हैसर आणि गावदेवीचे मंदिर आहे. त्यातील श्री रामाचे मंदिर हे गावचे पहिले सरपंच बाळकृष्ण गटू पाटील यांनी स्वखर्चाने बांधलेले आहे. येथील श्री रामजन्माष्टमीचा उत्सव अनेकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे. गावातील जत्रेला तसा मोठा इतिहास नाही. यापूर्वी गावात जत्राच होत नव्हती, मात्र आजूबाजूच्या गावांत होणारी जत्रा आणि त्यानिमित्ताने होणारा गावातील संवाद पाहता अलीकडे गावात ग्रामदेवतेची जत्रा होऊ लागली आहे. पूर्व बाजूस विस्र्तीण अशी शेतजमीन आणि पश्चिम बाजूस खाडीकिनारा, यामुळे शेती आणि मासेमारी हाच या गावाचा प्रमुख व्यवसाय मानला जातो. बेलापूर पट्टीतील काही गावांची शंभर टक्के आगरी किंवा कोळी अशी लोकवस्ती आहे. त्यातील तळवली हे एक गाव असे आहे ज्या गावाची शंभर टक्के लोकसंख्या ही कोळी बांधवांची आहे. गावातील अनेक महिला मासळी विकण्यासाठी मुंबई, ठाण्याला भल्या पहाटे जात होत्या. या गावाच्या समोरच नोसिल ही ६० च्या दशकातील सर्वात मोठी रासायनिक कंपनी आली आणि या गावाचा संपूर्ण कायापालट झाला. गावात शौचालय, शाळा, मंदिरांचा जीर्णोद्धार, दिवाबत्ती, गटारे यासाठी नोसिलने मदत केली. गावात बांधण्यात आलेली ग्रामपंचायतीची दुमजली इमारत तर पहिली शासकीय इमारत ठरली. याच काळात गावात पाणी व वीज आली. पाण्यासाठी एक मोठी टाकी बांधण्यात आली. हा कायापालट केवळ राहणीमानपर्यंत मर्यादित न राहता तो शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावणारा ठरला.

गावात ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत असेपर्यंत गावात निवडणूक नावाचा प्रकार झाला नाही. पालिका अस्तित्वात आल्यानंतर स्पर्धा झाली; पण गावातील एकोपा, भाऊबंदकी, प्रेम, जिव्हाळा कायम राहील याची काळजी संपूर्ण गावानेच घेतली आहे. त्यामुळे या गावाच्या एकीचे उदाहारण पूर्ण पंचक्रोशीत दिले जाते.

गावातील अनेक तरुणांनी शिक्षणाची कास धरल्यामुळे गावाची प्रगती झाली. बेडक्या पाटील, पोशा पाटील, देऊ पाटील आणि धोंडू पाटील यांचे आजोबा हे या गावचे आद्य नागरिक मानले जातात. एकाच कुटुंबातील समाजबांधवांमुळे सामंजस्यपणा ही या गावाची एक वेगळी ओळख दाखविणारा आहे. गावात १९६० पूर्वी गावकीच्या घरी पहिली शाळा सुरू झाल्याची नोंद आहे. १९७१ मध्ये गावासाठी गोठवली, राबाले यांच्यापासून वेगळे होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. त्याच्या दोन वर्षांनंतर जिल्हा परिषदेची शाळा सुरू करण्यात आली. त्यासाठी गावाने आपली सामूहिक जमीन दिली हे विशेष. त्या वेळी जिल्हा परिषदेने बांधलेल्या एका खोलीत चार वर्ग भरत होते. त्यामुळे गावातील काही ज्येष्ठांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. त्याला कारणही तसेच होते. नोसिल कंपनीत परदेशातून येणाऱ्या काही उच्च अधिकाऱ्यांच्या निवासासाठी कंपनीने याच गावाच्या पूर्व बाजूस जमीन विकत घेऊन ४५ एकरवर १८ बंगल्यांची एक वसाहत उभारली होती. त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा होत्या. ठाणे-बेलापूर पट्टीतील हे पहिले खासगी गृहसंकुल मानले जाते. या वसाहतीत राहण्यास येणारे सर्व गोरेसाहेब, त्यांचे राहणीमान, त्यांचा रुबाब, त्यांच्या सेवेला असणाऱ्या आलिशान गाडय़ा बघून आपल्या मुलांनीही साहेब व्हावे यासाठी ग्रामस्थांनी शिक्षणाला महत्त्व दिले. त्यामुळे गावातील ७० तरुण हे समोरच्या नोसिल व पील या मफतलाल उद्योगसमूहात नंतर कामाला लागले. शिक्षणामुळे गावात उच्चशिक्षितांची संख्या चांगली आहे. डॉ. मानिक शिवडीकर हे काही काळ याच तळवळी गावात होते. नंतर त्यांनी लंडनला जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले. गावचे रमेश पाटील हे या गावाचे पहिले उद्योजक. नोसिलसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन करून त्यांनी आपला जम बसविला आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला. राज्यातील सर्व कोळी बांधवांची एकजूट करण्याचे काम ते सध्या करीत आहेत.

गावचे पहिले सरपंच बी. जी. पाटील यांनीही छोटय़ामोठय़ा उद्योगांची सुरुवात केली होती. गावाला तळवली हे नाव कसे पडले याचा ठोस काही इतिहास नाही; पण खाडीला लागून असलेले हे गाव अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत तरले (वाचले) असल्याने तरलेल्या शब्दाचा अपभ्रंश होऊन ते तळवली म्हणून परिचित झाले असल्याचे काही ग्रामस्थांचे मत आहे. घणसोली आणि तळवळीच्या मधोमध असलेल्या एका तलावाचे उत्खनन या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानाने केलेले आहे. त्या वेळी घणसोलीकरांना या तलावावर कब्जा करण्यास संपूर्ण गावाने विरोध केला होता. नोसिल कंपनीतील अनेक परदेशी कामगार नंतर तळवली गावाचे रहिवाशी झाले, मात्र या गावाने या परदेशी पाहुण्यांनाही आपलेसे करून घेतले. व्हिन्सी, हेन्री, रॉबिन, लॉली, रिमू, लेगली या कामगारांपैकी आता केवळ लॉली यांची पिढी तळवलीकर झाली आहे. त्यांनी जमीन विकत घेऊन आपले कुटुंब या ठिकाणी वसविले आहे. पंचक्रोशीत शांत, संयमी असलेल्या या गावाची ओळख आजही कायम आहे, मात्र गावाच्या चारही बाजूंनी आता मोठय़ा प्रमाणात बांधकामे झाल्याने मूळ गावाचे सौंदर्य पुसले गेले आहे.