पनवेल : ४० वर्षानंतर पहिल्यांदा तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळ सुरू झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १० एकर भूखंडावर हे वाहनतळ उभारण्यासाठी १८ कोटी रुपये खर्च केले असून पुढील पाच वर्षांसाठी या वाहनतळाची व्यवस्था सांभाळण्यासाठी ठेकेदार नेमला आहे. या ठेकेदार कंपनीने औद्योगिक विकास महामंडळाला पुढील पाच वर्षासाठी १० टप्यांमध्ये ३ कोटी २५ लाख रुपये जमा करण्याच्या तत्वावर या वाहनतळाची देखरेखीचे काम ठेकेदार कंपनीला दिले आहे. या वाहनतळात १५५ ते २०० अवजड वाहने उभे राहू शकतील एवढी वाहनतळाची क्षमता आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळ सुरू करण्याची कारखानदारांची अनेक वर्षाची मागणी होती.
पावणे नऊशे हेक्टर परिसरावर तळोजा औद्योगिक वसाहत विस्तारलेली आहे. साडेसहाशेहून अधिक कारखाने या वसाहतीमध्ये असून यामध्ये रासायनिक उत्पादन घेणा-या कारखान्यांची संख्या मोठी आहे. वाहनतळ औद्योगिक वसाहतीमध्ये नसल्याने अवजड वाहने तासंतास रस्त्यावर उभी करुन ठेवावी लागत होती. रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघात अनेकदा वसाहतीमध्ये झाले आहेत. वाहतूक पोलीस आणि उद्योजकांनी वाहनतळाची मागणी औद्योगिक विकास महामंडळाकडे लावून धरल्याने राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी हे वाहनतळ होण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने हे वाहनतळ उभे राहू शकले. या वाहनतळामध्ये अवजड १५५ ते २०० वाहने उभी करण्याची क्षमता आहे. तसेच वाहनचालकांना आराम करण्यासाठी बोर्डींग व्यवस्था, स्वच्छता गृह, शौचालये, अवजड वाहने धुण्यासाठीचे सर्व्हीसींग स्टेशन, वाहन दुरुस्तीसाठी जागा, भोजनालयाची सोय केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटिव्ही कॅमेरा या वाहनतळात लावलेले आहेत.
हेही वाचा…एपीएमसी फळ बाजाराची दुरवस्था; देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप
मागील अनेक वर्षात पहिल्यांदाच वाहनतळ सुरू होत आहे. ही स्वागतार्ह बाब असून टीएमए संघटनेने (उद्योजकांची संघटना) यासाठी मी अध्यक्ष असल्यापासून पाठपुरावा केला आहे. अवजड वाहन रस्त्यांवर उभी करत असल्यामुळे तळोजातील वाहतूक कोंडी ही मुख्य समस्या बनली होती. वाहनतळ झाल्यामुळे कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. – संदीप डोंगरे, उद्योजक, तळोजा औद्योगिक वसाहत
© The Indian Express (P) Ltd