पनवेल : पनवेलमध्ये ८३ हजार कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच तळोजा औद्योगिक वसाहतीलासुद्धा स्मार्ट सिटीचा दर्जा मिळणार असल्याने येथील उद्योजकांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी समाधान व्यक्त केले आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील उद्याोजकांकडून सुविधा पुरविण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

राज्यातील सर्वात प्रगत औद्याोगिक वसाहतीमध्ये तळोजाचा समावेश होतो. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने (टीआयए) या परिसराला सुविधांसाठी वारंवार सरकारकडे पाठपुरावा केल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : भावी आमदारांची फलकबाजी, जागोजागी लागलेल्या होर्डिंगमुळे शहर विद्रुप, फलक व्यावसायिकांना नोटिसा

स्मार्ट औद्योगिक वसाहतीमुळे तळोजा औद्योगिक क्षेत्रात तळोजा उपविभाग कार्यालय, स्मार्ट सेवा ऑपरेशन एमआयडीसीचे मुख्य कार्यालय आणि नियंत्रण कमांड सेंटर ऑपरेट आणि व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक कमांड आणि नियंत्रण कक्षाची स्थापना होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उद्योग विभाग उभारणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच हवेतील प्रदूषणाचा गुणवत्ता दर्जा नियंत्रणाची यंत्रणा येथे उभारली जाईल. स्मार्ट पथदिवे, डिजिटल होर्डिंग, आपत्ती यंत्रणेअंतर्गत इमर्जन्सी कॉल बॉक्स आणि पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमसह स्मार्ट पोल यांसारख्या स्मार्ट घटकांची अंमलबजावणी उद्योग विभाग करणार आहे.

हेही वाचा – खारघर येथील नवा पूल वाहतुकीसाठी खुला

अद्यायावत यंत्रणेमधील सामूहिक माहिती संकलनाद्वारे स्मार्ट पाण्याचे मोजमाप केले जाणार आहे. सामायिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) फेज १ आणि २ तसेच पंपिंग स्थानकाच्या आत येणाऱ्या व प्रक्रियेनंतर बाहेर पडणाऱ्या वाहिनीवर प्रवाही गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि प्रवाह मापनाचे मोजमाप करणारी यंत्रणा बसविली जाणार आहे. याच प्रकल्पामध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रात वापर होत असलेल्या आणि मंजूर पाणी वापराबाबत सर्वेक्षण केले जाईल. अशाच पद्धतीने उद्योजकांकडून वापर होत असलेल्या ऊर्जा विभागाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. भौगोलिक माहिती प्रणाली ड्रोन कॅमेऱ्यावर आधारित थ्रीडी बेसने मोजमाप केले जाणार असल्याची माहिती टीआयएच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.