नवी मुंबई : तळोजा सेक्टर-१० परिसरात मंगळवारी दुपारी भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने परिसरात खळबळ उडाली असून, त्याचा शोध घेण्यासाठी तळोजा पोलिसांनी चार विशेष पथके नियुक्त केली आहेत.
ही घटना दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, सेक्टर-१० परिसरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा इलेक्ट्रिक कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट रस्त्यावरील नागरिकांच्या दिशेने गेली आणि एकामागोमाग अनेकांना धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आठ ते दहा जणांना धडक बसली. मात्र, पोलिसांनी अधिकृतरीत्या एका व्यक्तीचा मृत्यू आणि पाच जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने मदत करत रुग्णवाहिकांच्या साहाय्याने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव नदीम खान असे असून, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, वाहन अतिवेगात होते का किंवा तो मद्यधुंद अवस्थेत होता का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी चार पोलीस पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
