भरती प्रक्रिया रद्द

नवी मुंबई : करोनाची तिसरी लाट जेवढय़ा वेगाने पसरली तेवढय़ाच वेगाने नियंत्रणात आली आहे. शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्यसेवकांचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ८३७ जणांना कार्यमुक्त करण्यात आले असून राबवण्यात येणारी भरती प्रक्रियाही थांबवली आहे.

नवी मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू वाढत गेली. त्यामुळे आधीच तोकडी असलेली पालिकेची आरोग्य सेवा कमी पडत गेली. त्यामुळे पालिका प्रशासनाला आरोग्य सुविधांत वाढ करण्याबरोबर मनुष्यबळ भरती मोठय़ा प्रमाणात करावी लागली. महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवून १९११ जणांची भरती केली होती. पहिली लाट ओसरल्यानंतर काळजी केंद्रे बंद करीत हे कर्मचारी कमी केले होते. या वेळी या कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेत शहरातील परिस्थिती आणखी बिकट झाली होती. या वेळी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर ही लाट ओसरल्यानंतर पालिका प्रशासनाने काळजी केंद्रे पूर्ण बंद न करता ती फक्त कुलूपबंद केली. तसेच काही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ही प्रक्रिया सुरू असतानाच तिसरी लाट सुरू झाली व ती प्रचंड वेगाने पसरली. त्यामुळे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मागे घेत नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र जेवढय़ा वेगाने संसर्ग पसरला तेवढय़ाच वेगाने ही लाट आटोक्यात आली. त्यात लक्षणेविरहित रुग्ण अधिक असल्याने घरीच उपचारावर अनेकांनी भर दिला. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली. मात्र आरोग्य व्यवस्था तेवढय़ा प्रमाणात वाढवावी लागली नाही. आता शहरातील करोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. अडीच हजारावर गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता दोनशेच्या घरात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा बोजा कमी करण्याचे ठरवले आहे. मंगळवारी ८३७ जणांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

ठाण्यात जिल्ह्यत  निर्बंध जैसे थे ठाणे</strong>

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासाठी करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण हे गृहीत धरण्यात आले आहे. करोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या पहिल्या मात्रेचे प्रमाण हे ९० टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे प्रमाण हे ७० टक्के असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अद्यापही पहिल्या मात्रेचे प्रमाण हे सुमारे ८७ टक्के इतकेच आहे. ठाणे जिल्ह्यातील ७३ लाख ४६ हजार ७९२ गृहीत लाभार्थ्यांपैकी ६७ लाख ६८ हजार २०९ नागरिकांना लशीची पहिली मात्रा, तर ५३ लाख ३८ हजार ७५१ नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे. म्हणजेच, जिल्ह्यात ८७ टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा तर, ७० टक्के नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे.

नवी मुंबई महापालिकेने करोनाच्या काळात मोठय़ा प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली होती. परंतु सद्य:स्थितीत आवश्यकतेनुसार कर्मचारी, डॉक्टर यांना ठेवून अतिरिक्त डॉक्टर तसेच विविध पदांवरील तात्पुरत्या सेवेतील कर्मचारी कमी केले आहेत. 

– संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त