चाचण्या कायम तरीही रुग्ण कमी

महापालिका प्रशासनाने ‘लवकर निदान व लवकर उपचार’ ही कार्यपद्धती कायम ठेवत करोना चाचण्यांची संख्या कायम ठेवली आहे.

दैनंदिन रुग्णसंख्या २० च्या घरात

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने ‘लवकर निदान व लवकर उपचार’ ही कार्यपद्धती कायम ठेवत करोना चाचण्यांची संख्या कायम ठेवली आहे. दिवसाला सरासरी आठ हजार चाचण्या करण्यात येत आहेत. असे असतानाही शहरातील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या आठवडय़ात ३० पेक्षा अधिक असलेली दैनंदिन रुग्णसंख्या २० पर्यंत खाली आली आहे. 

गुरुवारी नवी मुंबईत करोनाचे १८ नवे रुग्ण सापडले. दिवाळीपूर्वी शहरात दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्या घरात होती. त्यात दिवाळीनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र दिवाळीनंतरही रुग्णसंख्या स्थिर राहिली. गेल्या आठवडाभरात सर्वाधिक रुग्णसंख्या ३७ रुग्णांपर्यंत गेली आहे. गुरुवारी नवीन १८ रुग्ण सापडले . दैनंदिन रुग्ण कमी झाल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्याही तीनशेपेक्षा कमी आहे. यात गृहअलगीकरणात असलेल्यांची संख्या अधिक आहे.

रुग्णसंख्या स्थिर असली तरी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने करोना दैनंदिन चाचण्यांची संख्या कमी केलेली नाही. नुकतीच नेरुळ येथील करोना प्रयोगशाळेची क्षमताही वाढविण्यात आली आहे. दररोज सरासरी आठ हजारांपर्यंत करोना चाचण्या करण्यात येत आहेत. ‘लवकर निदान व लवकर उपचार’ यावर पालिका प्रशासनाने पहिल्यापासून भर दिला असून अजूनही याला पालिका प्रशासन प्राधान्य देत आहे.

नवी मुंबईत लोकसंख्येच्या मानाने करोना चाचण्यांचा दर हा मोठा आहे. नवी मुंबईची तरंगती लोकसंख्या अंदाजे १६ लाख आहे. आतापर्यंत २१ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. लक्षणे दिसताच चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच एका सोसायटीत रुग्ण सापडल्यास सर्वाची चाचणी करण्यात येत आहे.  शहरात मलेरिया, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत असून कोणतीही लक्षणे दिसताच नागरिकांनी दुर्लक्ष न करता चाचण्या करून घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

शहरात प्रतिजन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण स्थिर असून रुग्णसंख्या कमी झाली असली तरी खबरदारी म्हणून करोना चाचण्या करण्यात येत आहेत. प्रयोगशाळेची चाचण्या करण्याची संख्याही वाढवली असून आवश्यकतेनुसार चाचण्या करण्यात येत आहेत. 

अभिजीत बांगर, आयुक्त महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tests persist patients decrease ysh

Next Story
मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज