नवी मुंबई : ऐरोली-काटई नाका पुलाच्या कामासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील भारत बिजली आणि सिमेन्स कंपनीजवळ गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ४, ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने या कालावधीत संबंधित मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास तसेच वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. कामाशी संबंधित एमएमआरडीएची वाहने मात्र या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाण्याकडून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सहा चाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांना दिघा येथील मुकुंद कंपनीपासून एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याने पुढे जाता येणार आहे. तर चारचाकी वाहनांनी भारत बिजली चौकातून उजवीकडे वळून ऐरोली फायर ब्रिगेड चौक, खेडेकर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
बेलापूरकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी रबाळे नाका सिग्नलवरून उजवीकडे वळून एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याने मुकुंद कंपनीमार्गे पुढे जावे. तसेच पटणीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी रबाळे नाका-दिवागाव सर्कल-पटणी रोड हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गर्डर टाकण्याचे काम रात्रीच्या वेळेत करण्यात येणार असल्याने या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बंद असलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न न करता वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी केले आहे.
