मृत्युदर नियंत्रणात

करोनाच्या पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांच्या कालावधीत शहरातील करोना मृत्युदर हा २.०४ टक्केपर्यंत होता.

पहिल्या लाटेत २.०४ तर दुसऱ्या लाटेत १.४ टक्के मृत्युदर

नवी मुंबई : करोनाच्या पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांच्या कालावधीत शहरातील करोना मृत्युदर हा २.०४ टक्केपर्यंत होता. जानेवारीनंतर करोनाची दुसरी लाट सुरू झाली असून मेपर्यंत पाच महिन्यातील मृत्युदर हा १.०४ टक्के आहे. पहिल्या लाटेपेक्षा आताचा मृत्युदर हा कमी असला तरी दैनंदिन मृत्यू हे अधिक असल्याने ही चिंता प्रशासनापुढे कायम आहे.

शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने पहिल्या लाटेतील सर्व उच्चांक मोडीत काढले. यात दैनंदिन रुग्णसंख्या ४ एप्रिल  रोजी १४४१ पर्यंत गेल्याने संकट निर्माण झाले होते. त्यानंतर शहरातील करोना संसर्ग नियंत्रणात येत दैनंदिन रुग्णसंख्या जशी वाढली तशी झपाटय़ाने कमी होत गेली. आता दिवसाला नवे रुग्ण हे १५० ते २०० च्या घरात आहेत. प्रतिबंधित क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी व संसर्ग साखळी तोडण्यावर भर देण्यात आला. तसेच शासनाने कडकडीत संचारबंदी लागू केल्याने ही परिस्थिती नियंत्रणात आली.

तसेच ५० वर्षांवरील करोना रुग्ण गृहविलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय घेत त्यांना रुग्णालयात दाखल करणे बंधनकारक केले. हे रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आल्याने याचा परिणाम रुग्ण बरे होण्यावर दिसून आला आहे. यामुळे प्रकृती अचानक खालावून रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले. पहिल्या लाटेतील मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या दहा महिन्यांच्या कालावधीत ५१,००२  एकूण रुग्णांपैकी १०५१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या काळातील मृत्युदर हा २.०६ टक्के इतका होता. तर करोनाच्या दुसऱ्या लाटेत जानेवारी २०२१ ते १९ मे २०२१ या पाच महिन्यांच्या काळात ४५, ७६६ जणांना करोना संसर्ग झाला. त्यापैकी ४७८ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण १.०४ टक्के इतके आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासोबतच मृत्यू प्रमाणावरही नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. शहरात अत्यवस्थ रुग्णांची संख्या ५५० वरून ७० वर आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. तर नवी मुंबईत शेजारील पालिकांच्या तुलनेत करोनामुक्तीचे प्रमाणही ९६.१२ टक्केवर पोहोचले आहे. सलग ३५ दिवस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. हे सर्व चित्र दिलासादायक असले तरी दैनंदिन करोना मृत्यू अजूनही जास्त असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यात अद्याप यश आलेले नाही. ही चिंता प्रशासनासमोर कायम आहे.

११० नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

गुरुवारी शहरात ११० नवे रुग्ण सापडले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  नव्या रुग्णांसह एकूण करोनाबाधितांची संख्या ९६ हजार ८७८ इतकी झाली असून मृतांची संख्या ही १५३५ झाली आहे. गुरुवारी २१३ जण करोनामुक्त झाले असून ९३ हजार २३२ जण करोनामुक्त झाले आहेत. आता शहरात २१११ जण उपचाराधीन रुग्ण आहेत.

करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत एकूण करोनाबाधितांच्या प्रमाणात मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. पहिली लाट दहा महिने सुरू होती, मात्र दुसरी लाट कमी कालावधीत खूप पसरली व उंचही होती. परंतु करोना मृत्युदर नियंत्रणात आहे. काही दिवसांपूर्वी ५५० अत्यवस्थ रुग्ण होते ते आता  ६० ते ७० पर्यंत खाली आहेत.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The death toll was 2 04 per cent in the first wave and 1 4 per cent in the second wave ssh

Next Story
‘एपीएमसी’च्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती?