महाराष्ट्रातील पहिले होमिओपॅथी आणि युनानी उपचार पद्धतीचे रुग्णालय उभारण्याचा मान नवी मुंबईतील खारघरला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने ही योजना आखण्यात आली असून या केंद्राच्या इमारतीचा कोनशिला समारंभ खारघर वसाहतीमधील सेक्टर १८ येथे भूखंडावर सोमवारी झाला. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ही कोनशिला बसविण्यात आली. ३० कोटी रुपये खर्च करून येत्या दीड वर्षांत हे तीन मजली, ५० खाटांचे रुग्णालय सुरू होईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात होमिओपॅथी व युनानी रुग्णालय सुरू करणार असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, प्रादेशिक संशोधन होमिओपॅथी संस्थेचे महासंचालक डॉ. राज. के. मनचंदा, राज्याचे आयुर्वेद संचालक कुलदीप कोहली, डॉ. जी. पी. थिल्लर, उपाध्यक्ष होमिओपॅथी केंद्रीय परिषदेचे डॉ. अरुण भस्मे व इतर उपस्थित होते. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची गैरहजेरी मात्र चर्चेचा विषय ठरली.

प्रादेशिक संशोधन होमिओपॅथी संस्थेच्या डॉक्टरांना सरकारी सेवेत सामावून घ्या, युनानी व होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा दर्जा द्या आदी मागण्या या वेळी उपस्थित डॉक्टरांनी केल्या.