नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी परिसरात मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरांमुळे संपूर्ण परिसरात ‘गुदमरवणारे’ वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
महापालिका आणि राज्य शासनाने गुरुवारी पर्यावरण दिन उत्साहात केला असला तरी वाशी आणि आसपासच्या परिसरात प्रदूषणाच्या धुरक्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात धूलिकण आणि उग्र वास येत असल्याने नागरिकांना श्वास घेणे कठीण बनले आहे. आंतरराष्ट्रीय हवामान निरीक्षण संस्था ‘आयक्यूएअर’च्या माहितीनुसार, ४ जूनच्या रात्री वाशीतील पी.एम. २.५ धूलिकणांची पातळी ५२.२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नोंदवण्यात आली. ही मात्रा जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा सुमारे १०.४ पट अधिक आहे. तर हवेची गुणवत्ता पातळी (एक्यूआय) १३५ ते १६० दरम्यान राहिली. ही पातळी देखील सर्वसामान्य पातळीपेक्षा जास्त आणि धोकादायक आहे. यामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध व श्वसनाचे त्रास असणाऱ्यांसाठी ही हवा अत्यंत धोकादायक ठरत आहे.
५ जूनच्या रात्री वाशी सेक्टर २६ चे रहिवासी प्रा. विनिलकुमार सिंग यांनी खासगी उपकरणाद्वारे हवेची मोजणी केली असता, पी.एम. २.५ कणांची पातळी तब्बल ४४६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असल्याचे आढळले. यावेळी हवेत वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे प्रदूषकाचा थर हवेत स्थिरावल्याचे दिसून आले. वाशीच्या सेक्टर २६, २८,२९ आणि तुर्भे व कोपरखैरणेच्या काही भागातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी नोंदवण्यात आल्या. ‘खिडक्या बंद करूनही दुर्गंधी घरात शिरते,’ अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. काहींना श्वसनास अडथळा निर्माण झाला, तर लहान मुले आणि वृद्धांमध्ये अस्वस्थता जाणवली.
“झिंक कास्टिंग करणाऱ्या कंपन्या रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर धूर सोडतात. औद्योगिक विकास महामंडळाकडून कोणताही नियंत्रणाचा उपाय नसल्याने नागरिकांना थेट याचा त्रास सहन करावा लागत आहे. हरित पट्टा नसल्याने प्रदूषण थेट घरांपर्यंत पोहोचते,’’ असे मत सेक्टर २६ चे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते संकेत डोके यांनी मांडले.
संबंधित भागात आमचे निरीक्षण पथक पाठवले जाईल. सध्या आमच्याकडे वाशीतील प्रदूषणाबाबत कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही, मात्र परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- सतीश पडवळ, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ