नवी मुंबई : शहरातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या घटल्याने पालिका प्रशासनाने आरोग्यव्यवस्था बंद करीत मनुष्यबळही कमी केले असताना आता शहरात पुन्हा करोना रुग्ण वाढू लागले आहेत. १ ऑगस्ट रोजी दैनंदिन रुग्णसंख्या ३२ होती. दोन दिवसांत त्यात दुपटीने वाढ होत ती ७० च्या पुढे गेली आहे. ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राने राज्यांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या असून नवी मुंबई महापालिका प्रशासनही सतर्क झाले आहे.नवी मुंबई शहरामध्ये करोनाचे नवे रुग्ण तसेच उपचार घेत असलेली रुग्णसंख्याही गेली काही दिवस स्थिर होती. दैनंदिन रुग्ण ५० पेक्षा कमी होते, तर पालिकेच्या एकमेव वाशी प्रदर्शनी केंद्रातील करोना रुग्णालयात एकमेव रुग्ण होता. सर्व रुग्ण घरीच उपचार घेत होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने आपली सर्व काळजी केंद्रे बंद करीत सिडको प्रदर्शनी केंद्रातील बाराशे खाटांचे रुग्णालयही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. याबरोबरच प्रशासनाने मनुष्यबळही कमी केले आहे.

असे असताना आता पुन्हा करोनारुग्णांत वाढ होऊ लागली आहे. १ ऑगस्ट रोजी शहरात फक्त ३२ करोना रुग्ण होते. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता दैनंदिन रुग्ण संख्या ७० पर्यंत गेली आहे. रुग्ण वाढत असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेत चाचण्यांची संख्या अधिक असल्याने दैनंदिन रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. करोनाच्या वाढत्या संख्येकडेही पालिकेचे लक्ष असून केंद्राने दिलेल्या सूचनांनुसार राज्याने पालिकांना सूचना देतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

आठवडाभरातील रुग्णसंख्या…
१ ऑगस्ट- ३२
२ ऑगस्ट- ४४

३ ऑगस्ट- ७४
४ ऑगस्ट- ७१

५ ऑगस्ट- ७२
६ ऑगस्ट- ७६

७ ऑगस्ट- ७०
८ ऑगस्ट- ५६