नवी मुंबई : हापूस आंब्याच्या बाजारात विक्री स्पर्धा सुरू झाल्यानंतर हापूस आंब्याचे किरकोळ बाजारातील आगमन जानेवारीपासून सुरू झाले आहे परंतु कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाचे नैर्सगिक आगमन हे गुढी पाडव्यापासून करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला विधिवत हापूस आंबा झाडावरून उतरवून त्याचा देवाला नैवेद्य दाखवून तो बाजारात विक्रीसाठी काही शेतकरी पाठवतात. घाऊक बाजारातील व्यापारीही गुढी पाडव्यापासूनच आंबा विक्रीला सुरुवात करणार आहे.
कोकणात हापूस आंब्याचा यंदा मोहर चांगला आला आहे पण जास्त थंडी आणि अवकाळी पावसामुळे या मोहराचे फळात रुपांतर कमी झाले आहे. तरीही यंदा हापूस आंब्याचे उत्पादन मागील वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जानेवारीपासून हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. संध्या दिवसाला वीस ते पंचवीस हजार हापूस आंब्याच्या पेटय़ा घाऊक बाजारात येत आहेत. गुढी पाडव्यापासून आंब्याच्या आवकमध्ये वाढ होणार असून कोकणातील आंबा बागातयदार हापूस आंबा याच दिवशी मुंबई पुण्याच्या घाऊक बाजारात पाठविण्याची पद्धत आहे. चाळीसपन्नास वर्षांपूर्वी हा आंबा बोटीतून मुंबईत येत होता पण आता वाहतूक व्यवस्था सुकर झाल्याने कोकणातील तीन जिल्ह्य़ातून हापूस आंबा मुंबईच्या बाजारात येणार आहे. हंगामातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या या फळाचे पूजन गुढी पाडव्याला केले जात असल्याचे संचालक संजय पानसरे यांनी सागितले.