नवी मुंबई: नवी मुंबई वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नेरुळ येथील नवीन इमारतीचे उद्घाटन असून गणेशोत्सव पूर्वी नवीन इमारतीतून कामकाज सुरू करण्यात येणार होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाचा मुहूर्त हुकला असून गणेशोत्सव नंतर होण्याची शक्यता आहे अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबई शहराकरिता सन २००४ मध्ये नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. मात्र तेव्हापासून हे कार्यालय वाशीतील एपीएमसी बाजारात भाडेतत्त्वावर सुरू आहे.नेरुळ येथे आरटीओची आता स्वतः ची इमारत तयार असून उद्घाटनाअभावी अद्याप नवीन इमारतीत कामकाज सुरू करण्यात आले नाही. आरटीओ कार्यालयाला स्वतःची जागा असावी म्हणून सिडको कडून नेरूळ सेक्टर १३ मध्ये भूखंड घेण्यात आला. मात्र सदर भूखंड ताब्यात घेण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विलंब झाला होता.




सन २०१९मध्ये या उप प्रादेशिक कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. परंतु त्यांनतर करोना आणि टाळेबंदीने या इमारतीच्या बांधकामाला खो बसला होता. जानेवारी- फेब्रुवारी मध्येच या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रस्ता सुरक्षा आणि हिरकणी कक्षाची नव्याने सुरू सध्या आरटीओचे कार्यलय छोट्या जागेत सुरू आहे. नेरुळ येथील नवीन इमारत सुसज्ज अशी ४ मजली आहे. या नवीन कार्यलयातत स्वतंत्र रस्ता सुरक्षा कक्ष आणि महिला कर्मचाऱ्यांकरिता हिरकणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. परिवहन कार्यालयाला सध्या दरमाह तीन लाख ६५ भाडे द्यावे लागत आहे . लवकरच नवीन कार्यालयातून कामकाज सुरू झाल्यास आरटीओची आर्थिक बचत होणार आहे.
नेरूळ येथील उपप्रादेशिक कार्यालयाची इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून गणेशोत्सवानंतर उद्घाटन होईल. – हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, नवी मुंबई आरटीओ