जेएनपीटी बंदरातील वाढत्या वाहनांसाठी नवी मुंबईसह उरण पनवेलला जोडणाऱ्या गव्हाण पुलाची उभारणी करण्यात आली असून या मार्गावरील सर्वात अधिक मार्गिका असलेल्या पुलावरील पथदिवे बंद असल्याने पुलावर अंधार पसरला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना अंधाऱ्या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा- दूकान चालवायला देणे व्यापाऱ्याला पडले महागात; १३ वर्षात १ कोटी ३५ लाखांचा अपहार

यापूर्वी या मार्गावरून जाणारे कंटेनर वाहन ५० पेक्षा अधिक फूट खाली कोसळून अपघात झाला होता. या गंभीर अपघातात वाहनचालकांला आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच कंटेनरमधील किंमती मालाचेही नुकसान झाले होते. नागरिकांचा प्रवास जलद गतीने व्हावा या करीता जेएनपीटी ने २ हजार ६०० कोटी रुपये खर्च केला आहे. त्यातून जेएनपीटी ते पळस्पे हा पुणे व गोवा महामार्गाला जोडणारा तर जेएनपीटी ते नवी मुंबई हा ठाणे ,दिल्ली महामार्गाला जोडणारा असे दोन सहा व आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारले आहेत.

हेही वाचा- उरणचे प्रवेशद्वार असलेला चारफाटा पुन्हा अंधारात; नागरिकांची गैरसोय

या महामार्गावरील गव्हाण फाटा हे महत्वाचे ठिकाण असून दोन्ही महामार्ग गव्हाण येथे मिळतात. त्यामुळे गव्हाण उड्डाणपूलावर वाहनांची सततची वर्दळ सुरू असते. त्याचप्रमाणे उड्डाणपूलाचा वापर करून वाहनांना मार्गही बदलावा लागतो. त्यासाठी पुलावर विजेचे दिवे असणे आवश्यक आहे. मात्र गव्हाण या वाहतुकीसाठी महत्वाच्या असणाऱ्या उड्डाणपूलावरील वीज अनेकदा गायब असते. याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. पुलावरील अंधारामुळे मोठ्या अपघाताचीही शक्यता आहे.