लोकसत्ता टीम
नवी मुंबई: एपीएमसी बाजार आवारात अनेक घटना घडत असतात. लूटमार, चोरी, अवैध धंदे, गांजा विक्रीच्या घटना नित्याने ऐकीवात येत असतात. मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून बाजार आवारात व्यापाऱ्यांच्या गाळ्यात, बाहेर चोरीच्या घटना वाढल्या असून बाजारात पार्किंगमध्ये उभ्या केल्या दुचाकी ही चोरी होत आहेत. तसेच याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा तोकडी असून सुरक्षा रक्षक ही अपुरे पडत आहेत. त्यामुळे वाढलेल्या चोरीच्या घटनांनी व्यापारी मेटाकुटीला आले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी बाजारपेठ म्हणून ख्याती आहे. मात्र ही बाजार समिती सीसीटीव्ही विना सुरक्षितेत मागे राहिली आहे. प्रत्येक मार्केटमध्ये सुरक्षा रक्षक तेसच व्यापारी असोसीएच्याशनच्या अंतर्गत काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. मात्र या १७० एकरवर वसलेल्या एपीएमसी मार्केटला जास्त सुरक्षेची गरज आहे. फळ , धान्य , भाजीपाला , मसाला , कांदा-बटाटा बाजार असे ५ बाजार एकाच आवारात सुरू आहेत. या बाजारात दरोरोज हजारो गाड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. त्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या प्रतीचा माल असतो. या बाजाराच्या आवारात ३७०० गोदामे, १५०० व्यावसायिक गाळे आहेत, मात्र याकरिता केवळ २७० सुरक्षा रक्षक असून तेही केवळ प्रवेशद्वारावर पहाऱ्याला असतात.
पाचही बाजार आवारात सीसीटीव्ही यंत्रणा ही तोकडीच आहेच. सुरक्षा रक्षक ही प्रवेशद्वार असून बाजारातील सुरक्षा मात्र बेभरोसे आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाजारातील शेतमालाच्या गोणीच्या गोणी हातोहात चोरी होत आहेत. तर दिवसाढवळ्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी चोरीला जात आहेत. शिवाय व्यापाऱ्यांच्या तिजोरीतील रोकड लंपास केली जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापारी आणि बाजार घटक हवालदिल झाले असून एपीएमसीने बाजारातील सुरक्षा अधिक करडी करावी अशी मागणी होत आहे.
एपीएमसी बाजारात चोरीच्या घटना वाढत आहेत. शेतमालाची चोरी होतेच शिवाय वाहने चोरी होत आहेत. माझ्या गाळ्यातुन चार लाखांची चोरी झाली होती. मात्र याची तक्रार करण्यासाठी एपीएमसीचा साधा टोल फ्री संपर्क ही उपलब्ध नाही. त्यामुळे चोरीची तक्रार करायची कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. -मनोहर तोतलानी, व्यापारी, कांदा-बटाटा बाजार