नवी मुंबई : करोनाकाळातील वैद्यकीय साहित्य खरेदी व उपचार केंद्र निमिर्तीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असताना घणसोली येथील एका करोना काळजी केंद्रातील गैरप्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. या केंद्रासाठी खरेदी करण्यात आलेले सुमारे ८४ लाखांचे वैद्यकीय साहित्य गायब असून या केंद्रात आतापर्यंत एकाही रुग्णावर उपचार केलेला नाही.
करोनाच्या तिसऱ्या लाटेत घणसोली सेक्टर ७ मधील शाळा क्रमांक ७६ व १०५ मध्ये करोना केंद्र उभारण्यात आले होते. मात्र यात गैरप्रकार झाल्याची शंका असल्याने मनसेचे संदीप गलुगडे यांनी पालिका प्रशासनाकडे माहिती अधिकारा माहिती मागवली होती. यात पालिका प्रशासनाने जीएसटीसह ८४ लाख ८८ हजार ३८८ रुपये इतका खर्च करून हे केंद्र उभारण्यात आले होते. याचे काम मेसर्स एम.एम. काळभोर यांना देण्यात आले होते, याबाबत व खरेदी केलेल्या साहित्याबाबत माहिती दिली आहे. मात्र धक्कादायक म्हणजे इतकी रक्कम खर्च करून उभारण्यात आलेल्या या केंद्रात एकाही करोना रुग्णावर उपचार केलेला नसून सद्य:स्थितीत हे केंद्र बंद असल्याचे माहिती पालिका प्रशासनानेचि दिली आहे. यावरून गरज नसताना करोनाकाळात अनावश्यक खर्च केल्याचे उघड होत असल्याचा आरोप गलुगडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
केलेली साहित्य खरेदी व त्याचे बाजारमूल्य यातही मोठी तफावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. २८ ते ३२ लाखांचे साहित्यासाठी कंत्राटदाराला ८४ लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ८४ लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले हे सर्व वैद्यकीय साहित्य कुठे आहे याबाबतही प्रशासन माहिती देऊ शकलेली नाही. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गलुगडे यांचा दावा आहे.
पालिका प्रशासनाने दिलेली माहिती व वास्तव पाहता यात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. याबाबत पालिका आयुक्तांकडे अनेकदा वेळ मागितली आहे. मात्र अद्याप प्रतिसाद नाही. याबाबत त्यांना पत्र देण्यात आले असून चौकशी करून योग्य कारवाई न केल्यास आंदोलन केले जाईल.-संदीप गलुगडे, मनसे पदाधिकारी, नवी मुंबई</strong>
+