नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले. हा प्रकार सीबीडी सेक्टर ५ येथे घडला. आरोपींकडून दुचाकी जप्त केली आहे. आरोपी सराईत असून चोरीसाठी मुंब्राहून नवी मुंबईत येत होते. मेहंदी हसन जाफरी आणि मोहसीन खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. एसबीआय बँकेत गोपाळ गुरुजी हे ज्येष्ठ नागरिक कामानिमित्त आले असता आरोपींनी दुचाकीवरून येऊन त्यांच्याजवळील रोख रक्कम जबरीने हिसकावून पळ काढला. पिशवीत १६ हजार ५०० रुपये इतकी रक्कम होती. मंगळवारी दुपारी दीड-पावणेदोनच्या सुमारास सीबीडी सेक्टर ५ मधील एसबीआय बँकेत फिर्यादी कामासाठी आले असता सदर आरोपींनी येऊन त्यांच्या हातातील रोख रक्कम जबरीने चोरून पळ काढला. दरम्यान गुरुद्वाराजवळील पोलीस चेक नाक्यावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाल्यावर स्थानिकांच्या मदतीने उपस्थित पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. विचारपूस करून पोलिसांनी दोघांना रुग्णालयात उपचार करून त्यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एकावर सात तर एकावर दोन गुन्हे

त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ही चोरीची असून त्याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक दोघे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मेहेंदी हसन याच्यावर ठाण्यात ६ तर मुलुंड पोलीस ठाण्यात १ असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. तर मोहसीन लालू खान याच्यावर हडपसर पोलीस ठाणे, पुणे येथे २ गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व रोख रक्कम १६ हजार ५०० रुपये पोलिसांनी हस्तगत केले असून त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता सीबीडी पोलिसांनी वर्तवली आहे.