नवी मुंबई : बाईकची राईड घेताना थोडा आराम करण्यासाठी थांबलेल्या युवकांना कटरचा धाक दाखवून त्यांची चीज वस्तू आणि जॅकेट बळजबरीने घेऊन चोरटे पळून गेले. या प्रकरणी दोन अज्ञात युवकांविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा – नवी मुंबई: विकास आराखडय़ावर आजपासून सुनावणी
हेही वाचा – पनवेल: हळदी समारंभात धिंगाणा घालणा-या पोलीस उपनिरिक्षकावर गुन्हा दाखल
दीपक चौधरी, असे यातील फिर्यादीचे नाव आहे. दीपक व त्याचे मित्र अक्षय मिनियार आणि अक्षय शिंदे हे तिघेही दोन दुचाकीने ऐरोली येथून अलिबागला निघाले होते. १२ तारखेला पहाटे साडेतीनच्या सुमारास शीव पनवेल महामार्गावर नेरूळ येथील आदिराज रेसिडेन्सी नजीक थोडा आराम करावा म्हणून गाड्या थांबवून ते येथील पदपथावर थांबले. सकाळी ४ च्या आसपास दोन स्कुटीवरून चार युवक आले. अज्ञात चार युवकांपैकी एकाने कुठले आहात? कुठे चाल्लात? अशी चौकशी केली. चौकशी करीत युवक अक्षय नजीक आला व त्याने अक्षय याने घातलेले जॅकेट मागितले. त्याला जॅकेट दिल्यावर त्याच व्यक्तीने कटरचा धाक दाखवून श्रीकांत याच्या हातातील अंगठी आणि मोबाईल बळजबरीने घेतला. अज्ञात व्यक्ती पळून जाण्याच्या बेतात असताना दीपक याने त्याची गाडी मागून पकडली. मात्र आरोपींनी तशीच गाडी दामटली, त्यामुळे दीपक हा काही अंतरापर्यंत फरफटत गेला व जखमी झाला. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण ४० हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरी गेलेला आहे.