तिसऱ्या मुंबईची मुहूर्तमेढ

गेली वीस वर्षे रखडलेला खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रातील ३२ गावांचा विकास आराखडा तयार करण्यास सिडकोने प्राधान्य दिल्याने आता नवी मुंबईच्या पश्चिम भागाचा देखील विकास होणार आहे.

खोपटातील ३२ गावांच्या विकास आराखडय़ाची अधिसूचना

नवी मुंबई : गेली वीस वर्षे रखडलेला खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रातील ३२ गावांचा विकास आराखडा तयार करण्यास सिडकोने प्राधान्य दिल्याने आता नवी मुंबईच्या पश्चिम भागाचा देखील विकास होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या या क्षेत्रामुळे तिसऱ्या मुंबईची मुर्हूतमेढ रोवली जाणार आहे.

मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली, मात्र नवी मुंबईची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने आता नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्राच्या कुशीत हे खोपटा नगर नियोजन होणार आहे. सिडको या ठिकाणी रस्ते, पाणी, दिवाबत्ती या पायाभूत सुविधांवर कोटय़वधी रुपये खर्च करणार आहे. मुंबई-गोवा मार्गावर या नगरीची निर्मिती ही कोकण प्रगतीलाही हातभार लावणारी आहे.

रायगड जिल्ह्य़ातील प्रत्येक क्षेत्राचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने ३ एप्रिल २००८ रोजी खोपटा नगर निर्माण करण्याचा निर्णय घेतला. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांचा देखील विकास व्हावा ही यामागे शासनाची भूमिका होती. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्याच्या जवळील बारापाडा, कर्नाळा, डोलघर, साई, कासारभट, दिघाटी या सहा गावांचा विकास आराखडा करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. या सहा गावांचा सिडकोने तयार केलेल्या विकास आराखडय़ाला यंदा एप्रिल महिन्यात शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नगरविकास विभागाने या सहा गावांबरोबरच आणखी २६ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडकोला जून २१ मध्ये देण्यात आले आहे. पनवेल आणि उरण तालुक्यातील गावांचा अस्ताव्यस्त विकास होऊ नये यासाठी शासनाने ३२ गावांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे शासनाचे आदेश आहेत. सिडको हा एकत्रित विकास आराखडा तयार करणार असून तो लवकरच जाहीर केला जाणार आहे. कोकणच्या प्रवेशद्वाराजवळ हे एक सुनियोजित क्षेत्र उभे राहणार आहे.

या कामांचे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत. या भागासाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हेटवणे धरणातून केली जाणार आहे. नवी मुंबईच्या पश्चिम बाजूस असलेले हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळाच्या परिघात येणार असल्याने नागरिकांची या भागाला पंसती मिळणार आहे.

डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

३२ गावे यामध्ये विंधणे, हरिश्चंद्र पिंपळे, बोरी बीके, बोरीचा कोठा, धसाखोशी, जुई, चिखली भोम, भोम, चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, बांधपाडा, कचेरेपाडा, तळबंदखार, पिरकोन, सांगपालेखार, गोवठणे, पाले, सारडे, वशेणी, पुनाडे, जुई पुनाडे, अंतराबामखार, कडापे व आवरे या उरण तालुक्यातील तर कनार्ळा,बारापाडा, दिघाटी, केळवणे, साई, कासरभाट व डोलघर अशा पनवेलमधील गावांचा समावेश करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Third mumbai muhurtmedh ysh

ताज्या बातम्या