८७ हजार लसमात्रा शिल्लक

संपूर्ण लसीकरणासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांकडून टाळाटाळ सुरूच आहे.

दुसऱ्या मात्रेसाठी टाळाटाळ सुरूच

नवी मुंबई : संपूर्ण लसीकरणासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांकडून टाळाटाळ सुरूच आहे. पालिकेकडे ८७ हजार लस मात्रा शिल्लक आहेत.

नवी मुंबईत ११ लाख ७ हजार लसपात्र नागरिकांची संख्या गृहीत धरून लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत  १८ लाख २९ हजार ६०० लसमात्रा देण्यात आल्या असून यात ११ लाख ४५ हजार ८८३ जणांना पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले आहे. तर दुसऱ्या मात्रेचे लसीकरण हे केवळ ६ लाख ८३ हजार ७१७ जणांनाच झाले. करोना सुरक्षेसाठी लस ही महत्त्वाची असून दोन्ही मात्रांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र नवी मुंबईत दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणासाठी टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वीपासून लसीकरण केंद्रे ओस पडल्याने पालिका प्रशासनाने आपल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून संपर्क करीत लस घेण्याची विनंती करण्यात येत आहे. तर दुसरीकडे रेल्वे स्थानकांवर केंद्रे सुरू केली आहेत. घराजवळ लसीकरणाला प्राधान्य देत लसीकरण करण्यात येत आहे. मात्र असे असतानाही शहरात लसीकरण संथ गतीने सुरू आहे.

यापूर्वी शहरात लस नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत होती. आता पालिकेकडे लस आहे पण लाभार्थी लस घेण्यास येत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडे मोफत लसीकरणाचे ८७ हजार लसमात्रा शिल्लक आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी लस घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.

नवी मुंबईकर नागरिकांनी आपला करोना लसीचा पहिली मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाल्यावर लगेच नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपली दुसरी मात्रा घ्यावी व संपूर्ण लस संरक्षित व्हावे. पालिकेकडे लसमात्रा उपलब्ध होत असून जवळजवळ ८७ हजारांपेक्षा अधिक लसमात्रा शिल्लक आहे.

डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thousand lasmatra balance ysh

ताज्या बातम्या