नवी मुंबई : विदेशात निर्यात केलेल्या मुद्देमालातून चोरी करून तो विकणाऱ्या दोन आरोपींसह व्यापाऱ्यास अटक करण्यात आली आहे. सदर माल जेएनपीटी बंदरातून आखाती देशात पाठवण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच गोदामामधून माल चोरी करण्यात आला होता.
सुरेश चौधरी आणि रत्नाभाई पटेल अशी चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत तर चोरीचा मुद्देमाल संजय सूर्या याने घेतला होता. जेएनपीटी बंदरातून विदेशात मुद्देमाल पाठवण्यापूर्वी तांत्रिक कारणाने उशीर झाला तर सदर माल परिसरातील गोदामात ठेवला जातो. त्यानंतर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर माल जहाजावर चढवून पाठवला जातो. अशाच प्रकारे आखाती देशात झीसन कंपनी कपडा पाठवणार होती. त्यापूर्वी सदर कपडा विनय नावाच्या गोदामामध्ये ठेवला व नंतर आखाती देशात पाठवण्यात आला. मात्र सुमारे दीड कोटींचा माल कमी आल्याची तक्रार माल आयात करणाऱ्या कंपनीने केली. त्यामुळे गोदाम ते जेएनपीटी दरम्यान चोरी झाल्याची शक्यता होती.
उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर तपासात वेअर हाऊस मालक सुरेश चौधरी यांनाच ताब्यात घेत चौकशी केली
असता त्यांनीच हा चोरीचा प्रकार केल्याचे समोर आले. त्यांचा मित्र पटेल याच्या मदतीने त्यांनीच हा माल सूर्या यांना विकला होता. त्यामुळे पोलिसांनी राजस्थान येथून सूर्या, खारघर येथून सुरेश चौधरी आणि पटेल याला शीव येथून अटक केली. या प्रकरणातील ४१ लाख २० हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.
