लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत संध्याकाळी चार वीस ते सहा या वेळेत तीन घरांत चोरी करून चोरट्यांनी १ लाख ५८ हजार २५० हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. यात दागिने आणि रोकडचा समावेश आहे. अवघ्या दोन-अडीच तासांत तीन घरफोड्या करून चोर पसार झाल्याने परिसरात चोरट्यांची दहशत पसरली आहे.

गौरव कापडणीस हे रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या अमृतधाम सोसायटी गोठीवली गावात राहतात. १७ तारखेला रात्री ते नेहमीप्रमाणे घरी आले असता त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत होता तसेच आत गेल्यावर सर्व सामान अस्ताव्यस्त पसरल्याचे दिसले. तपासणी केली असता त्यांच्या घरातील दागिने चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

आणखी वाचा-२०० कांदळवन स्वच्छता मोहिमांतून ६०० टन कचरा संकलन

तसेच याच सोसायटीतील अन्य दोन घरांतही चोरी झाल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही घरांत मिळून १ लाख ५८ हजार २५० हजाराचा ऐवज चोरी झाला आहे. यात दागदागिने आणि रोकडचा समावेश आहे. या प्रकरणी गौरव आणि अन्य दोघांनी रबाळे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.