पनवेल – पनवेल व तळोजा परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. भरधाव व निष्काळजी वाहनचालकांमुळे हे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून, दोन प्रकरणांत आरोपी वाहनचालक फरार आहेत.पहिली घटना १६ मार्चच्या मध्यरात्री तळोजा औद्योगिक वसाहतीतील कटरझोन परिसरात घडली. सूनील फोर्जिंग अॅण्ड स्टील इंडस्ट्रीजसमोरील रस्त्यावर ४० वर्षीय अलिम अचिरूद्दीन गाझी यांना भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोडून वाहनचालक फरार झाला.
अलिम हे मूळ पश्चिम बंगाल येथील रहिवासी होते. या अपघाताची माहिती अलिम यांच्या नातेवाईकांना खूप उशीराने मिळाली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दुसरी घटना १७ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर कोन गावाजवळील मिठास मिठाई दुकानासमोर घडली. रस्ता ओलांडताना ४१ वर्षीय धनेश्वर दास यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाली होती.
उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिसरी घटना मंगळवारी (ता.१८) रात्री पावणेदहाच्या सुमारास जेएनपीटी ते पळस्पे महामार्गावर निलेश धाब्यासमोर घडली. रस्ता ओलांडणाऱ्या ६३ वर्षीय शिवाजी खंदारे यांना एका मोटारीने धडक दिली. खंदारे हे कंटेनरला रस्ता दाखविण्यासाठी येथे आले होते. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून मोटारचालकावर कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गांवरील वाहतूक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, वेगाशी स्पर्धा करून वाहन चालविणारे, निष्काळजी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सर्वाधिक राष्ट्रीय व राज्य महामार्ग पनवेलमध्ये आहेत. मात्र महामार्गांवर अपघातानंतर जखमींना तातडीने ट्रामासेंटरपर्यंत नेणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे या तीनही घटनांवरून समोर येत आहे.
