नवी मुंबई: तुझ्या नवऱ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करायची आहे असे सांगून तीन जणांनी एका महिलेस मुंबईतुन धमकावून नवी मुंबईतील एपीएमसी भागात आणले. नवऱ्याला सोडवायचे असेल तर ५० हजाराची मागणीही तिघांनी केली. हेच पैसे आणून देण्यासाठी म्हणून महिलेने शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली ते तडक तिने एपीएमसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करीत तिघांना अटक केली आहे. दिनेश मारुती गंगावणे, संजय बाळू गावकर, राज भीमसेन कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. मुंबई मध्ये राहणाऱ्या रशिदा शेख या महिलेच्या पतीवर यापूर्वी गुन्हा दाखल होता. हि माहिती आरोपींना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पती घरी नसताना हे तिघे रशिदा यांच्या घरी पोहचले. त्यांनी मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करीत स्वतःचे ओळखपत्र दाखवले. तसेच पतीवर अजून एक अंमली पदार्थ विरोधी गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगत चौकशीसाठी म्हणून तिला ताब्यात घेतले व तडक एपीएमसी गाठले. त्या ठिकाणी तिघांनी पतीवरील पुढील अटकेचे कारवाई टाळायची असेल तर ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र एवढे पैसे नाहीत असे सांगितल्यावर शेवटी १५ हजार रुपयांवर तिघांनी तडजोड केली. हेच पंधरा हजार रुपये आणण्यासाठी म्हणून महिला तेथून निघाली. हेही वाचा. ऐन गणेशोत्सवात वाळवीग्रस्त कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक, बैठकीतील सुचनाची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन करणार मात्र तिला हे तिघे पोलीस नसल्याची शंका आल्याने तिने घरी न जाता थेट एपीएमसी पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. याबाबत तात्काळ गुन्हा नोंद करून या महिले सोबत पोलीस पथक पाठवून तिघांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिले. गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी त्या तिघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यावर चौकशी केली असता तिघांनी पोलिसांचे ओळखपत्र म्हणून पत्रकार असल्याचे ओळखपत्र दाखवून महिलेस बोलण्यात गुंगवले असल्याचेही समोर आले. तिघांनी गुन्हा मान्य केला असून त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली.