नवी मुंबई : मुंबई एपीएमसीच्या भाजीपाला घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी टोमॅटोला प्रति किलो २४ ते ३० रुपये असा दर मिळत असताना, शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत हाच टोमॅटोचा दर १२ ते १६ रुपये प्रति किलो दराने विकला गेला. त्यामुळे टोमॅटोच्या भावात जवळपास निम्म्याने घट झाली.

टोमॅटो दर घसरण्यामागे हंगामी पिकाची मोठ्या प्रमाणातील आवक हे प्रमुख कारण मानले जात आहे. जानेवारी महिन्यात राज्यातील विविध भागांतून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात दाखल झाला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात माल आल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त झाला असून त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.

पिकाची आवक अपेक्षेपेक्षा अधिक

सध्या टोमॅटोचा रब्बी हंगाम सुरू आहे. डिसेंबर अखेरपासून जानेवारीत या हंगामातील टोमॅटो बाजारात येण्यास सुरुवात होते. यंदा हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादन चांगले झाले असून, पिकाची आवक अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र टोमॅटो ही नाशवंत भाजी असल्याने दीर्घकाळ साठवणूक करणे शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध दरातच माल विकावा लागत असून दरावर आणखी ताण येत आहे.

घाऊक बाजारात दर चढेच

कमी भावाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. घाऊक बाजारातील दर कमी झाल्याने शहरातील भाजीपाला बाजारातही टोमॅटोचे दर तुलनेने कमी झाले आहेत. मात्र वाहतूक, हाताळणी आणि किरकोळ नफा यामुळे ग्राहकांना घाऊक बाजाराइतक्या कमी दरात टोमॅटो मिळत नसल्याचे चित्र आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, पुढील काही दिवस टोमॅटोची आवक अशीच राहण्याची शक्यता असून, मोठ्या प्रमाणात पीक येत राहिल्यास भावात लगेच सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.