नवी मुंबई : यंदा टोमॅटोचे उत्पादन तसेच लागवड कमी आहे, त्यात रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटले आहे तर मागणी जास्त आहे. त्यामुळे मागील आठवडय़ात घाऊक बाजारात ६० तर किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली होती. गुरुवारी बाजारात आवक थोडी वाढली असल्याने दरात १० रुपयांनी घसरण झाली आहे. परंतु यंदा लागवडच कमी असल्याने दर चढेच राहतील, असे मत घाऊक व्यापारी यांनी व्यक्त केले आहे.

दक्षिण भारतात अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागात महाराष्ट्रातून टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक निम्म्यावर आल्याने दरात वाढ झाली होती. मागील आठवडय़ात बाजारात ८-१० गाडय़ा आवक होत होती ती आता १५ गाडी होत आहे. आधी टोमॅटो ५० ते ६० रु. प्रतिकिलोने घाऊक बाजारात विक्री होत होती. तर  किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली होती. मात्र, बाजारात १० रुपयांनी घसरण झाली असून ४०-५० रुपये दर झाले आहेत.

मागील वर्षी टोमॅटोच्या पिकावर तुटा आळी माशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यातच दक्षिण भारतात अवकाळी पावसाने टोमॅटोच्या पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे राज्यात टोमॅटोच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असल्याने एपीएमसी बाजारात आवक निम्म्यावर आली आहे. सध्या दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांत महाराष्ट्रातील टोमॅटोच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश टोमॅटो तिकडे जात असून ५५ ते ६० टक्के आवक घटली होती. आता आवक थोडी वाढली आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आवक घटल्याने दरात वाढ होत आहे. मात्र, पुढील कालावधीत दर चढेच राहतील, अशी माहिती व्यापारी तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.