नवी मुंबई : दक्षिण आफ्रिकेत पिकणारा आणि युरोपात मोठी लोकप्रियता मिळवलेला ‘टॉमी अॅटकिन्स’ आंबा वाशीच्या मुंबई एपीएमसी फळबाजारात दाखल झाला आहे. ऐन हिवाळ्यात बाजारात आंब्याची आवक झाल्याने आंबा प्रेमींना मोसमाच्या आधीच आंबा चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
एपीएमसी बाजारात टॉमी अॅटकिन्सची दर आठवड्याला ५०० ते ६०० बॉक्स इतकी आवक होत आहे. तेजस्वी लाल-सोनसळी रंग, आकर्षक आकारमान आणि मधुर चवीमुळे या आंब्याची आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष मागणी असते. बाजारात हा आंबा ‘लिली आंबा’ म्हणूनही ओळखला जातो.
टॉमी अॅटकिन्स हा आकारात मोठा आंबा असल्याने एका बॉक्सचे वजन साधारण चार किलो असते. प्रत्येक बॉक्समध्ये १० ते १४ फळे मिळतात. सध्या बाजारात अन्य आंब्यांची उपलब्धता नसल्यामुळे टॉमी अॅटकिन्सला चांगला भाव मिळत असून एका बॉक्सचा दर सुमारे २५०० ते २७०० रुपये इतका आहे.
या आंब्याचा हंगाम साधारणतः १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी दरम्यान राहतो. त्यामुळे हा आंबा भारतीयांसाठी दुर्लभ आंबा मानला जातो. हिवाळ्यातल्या या आंब्यामुळे भारतीयांना उन्हाळ्याआधी आंब्याची चव चाखण्याची संधी मिळते. टॉमी अॅटकिन्स हा रंग, सुगंध आणि मधुर चवीमुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. हिवाळ्यातही आंबा मिळत असल्याने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे, असे पानसरे यांनी सांगितले. सध्या बाजारात दर आठवड्याला ५००-६०० बॉक्स या आंब्याचे येत असून, विक्री झपाट्याने होत असल्याची माहिती पानसरे यांनी दिली आहे.
टॉमी अॅटकिन्सचा बाजारात प्रवेश झाल्याने प्रिमियम फळांच्या स्पर्धेत वाढ झाली आहे. दुबई, केनिया आणि इजिप्तमधून येणारी ‘केंट’, ‘कीट’ व ‘सेन्सेशन’ ही आंब्याची विदेशी जात सध्या स्पर्धेत आहेत. मात्र रंग आणि टिकाऊपणामुळे टॉमी अॅटकिन्सला ग्राहकांची जास्त पसंती मिळत असल्याचे व्यापारी सांगतात.
सध्या भारतात लग्न सराई असल्याने ग्राहकांकडून या आंब्याला मागणी आहे. हिवाळ्यातही आंबा मिळत असल्याने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. – चिन्मय पानसरे, आंबा विक्रेते.
पिकणाऱ्या पट्ट्यात यंदा दुष्काळ
दक्षिण आफ्रिकेतील काही प्रांतांत झालेल्या अल्प पावसामुळे उत्पादनावर यंदा मर्यादित परिणाम झाला आहे. त्यामुळे डिसेंबरच्या अखेरीस आयातीत आंब्यांची आवक किंचित कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
