नवी मुंबई: मराठा आरक्षण साठी मनोज जरांगे आणि कार्यकर्ते मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्या समवेत लाखोंचा जनसमुदाय येऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता नवी मुंबईत वाहतूक बदल कारण्यात आले आहेत. जेणेकरून आंदोलक आणि नियमित वाहतूक दोघांनाही अडथळा निर्माण होणार नाही.

२९ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणी साठी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी अनेक अटी सह परवानगी देण्यात आली आहे. तसेज राज्यातील इतर भागासह नवी मुंबई पुणे पनवेल भागात आंदोलन बाबत अनेक बैठक झाल्या आहेत.

या पूर्वी मुंबईत आंदोलन साठी मराठा आंदोलक निघाले असता त्यांना नवी मुंबईत रोखण्यात तत्कालीन मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय शिष्टाई यशस्वी ठरली होती.

मात्र आता पुन्हा आंदोलन सूरू झाले असून ते मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार असल्याने नवी मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलनाचे अनुषंगाने  मनोज जरांगे हे  २७ ऑगस्ट पासून पासुन आंतरवली सराटी, जालना ते मुंबई असे मराठा आंदोलकांसह येणार आहेत. त्यांचे सोबत मोठया प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचा ताफा असणार आहे.  आंदोलक हे  २८ तारखेला  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणार आहेत.

या आंदोलनाचे अनुषंगाने त्यांची वाहने तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांच्या वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दिनांक २८ ऑगस्ट  सकाळी १० वाजल्या पासून ते २९ ऑगस्ट पर्यंत   मराठा आंदोलकांची वाहने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून नियोजित ठिकाणी पोहचे पर्यंत   नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड, मालवाहतुक करणा-या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी  करण्यास पुर्णतः बंदी असणार आहे. या अधिसूचनेतून  जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दल वाहने , रुग्णवाहिका, शासकीय वाहने, मराठा आंदोलकां सोबत असलेली वाहने, प्रवासी वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही.