एपीएमसी मध्ये वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे एकीकडे वाहन चालक आणि खास करून ट्रक चालक हैराण आहेत तर दुसरीकडे वाहतूक पोलीस केवळ बेकायदा पार्किंग, सिग्नल तोडणे अशा कारवाईत व्यस्त आहे. या ठिकाणी असणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांच्या गाड्यावर कारवाई टाळली जात असून आपण अशाच वाहन चालकांच्या बेशिस्त वाहन चालवण्याच्या सवयीने वाहतूक कोंडी वारंवार होत असल्याचे चित्र आहे.
एपीएमसी मध्ये रोज हजारो ट्रक कृषी मालाची आवक होत असते. त्यात सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी या सर्वच बाजार समितीत आवक दिड पटीने वाढलेली असते. अशा वेळी अनेकदा ट्रक एपीएमसी प्रवेशद्वारावर आत प्रवेश मिळवण्यासाठी वाट पाहत रस्त्यावर गाड्या उभ्या करतात. हि अडचण असली तरी बहुतांश वेळेला ट्रक चालक शिस्तीत रस्त्याच्या कडेला ट्रक पार्क करून हळू हळू पुढे जात असतात. या ठिकाणी जसा जड अवजड वाहनांचा राबता मोठ्या प्रमाणात आहे तसाच छोट्या मालवाहू गाड्या, रिक्षा, अन्य वाहने आणि दुचाकींचाही वावर प्रचंड असतो. या परिसरात पार्किंग एक मोठी समस्या असून अनेकदा बेकायदा वाहन पार्किंग होत असते.




हेही वाचा >>> उरण मधील सिडकोची उड्डाणपूल महिनोनी महिने अंधारात ; वीज रोहित्र चोरी असल्याचे कारण पुढे
या पेक्षा सर्वात मोठी समस्या आहे ती ठिकठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होण्याची. विशेष म्हणजे वाहन कोंडीस सर्वाधिक कारण ठरणारा घटक आलिशान महागड्या गाडी चालकाचे बेशिस्त वाहन चालवणे आणि प्रवासी रिक्षा चालकांचे प्रवाशांनी हात करताच मागून येणाऱ्या वाहनाचा विचार न करता अचानक गाडी थांबवणे, प्रवाशांची वाट पाहत अर्ध्या रस्त्यात रिक्षा लावणे अशा प्रकारातून वाहतूक कोंडी होते. अशा रिक्षांना अनेकदा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. मात्र आलिशान गाडी चालकाला अपवादात्मक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते असा आरोप मनोज जाधव या रिक्षा चालकाने केला आहे.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्वत्र दुभाजक आहेत. अनेकदा मार्केट मधून बाहेर पडल्यावर दुभाजक मधील दुसऱ्या मार्गिवर जाण्याचा रस्ता जवळ असतो मात्र गाडी विरुद्ध दिशेने थोडी बहुत चालवावी लागते. अशा वेळी बहुतांश वाहन चालक योग्य गाडी चालवून लांबचे वळण मार्ग (यु टर्न) निवडतात मात्र आलिशान गाड्यातून फिरणारा वाहन चालक बिनदिक्कत विरुद्ध दिशेने वाहन दामटतो. एपीएमसी भागात वारंवार वाहतूक कोंडी होण्याचे सर्वात मुख्य कारण अशाच प्रकारे विरुद्ध दिशेने वाहन चालवणे ठरत आहे. मात्र अशा वाहनांवर नजर ठेवत कारवाई करताना पोलीस आढळून येत नाही. आणि अनेकदा असा प्रकार नजरेस पडला तरी बडा व्यापारी वा राजकीय हस्ती असल्याने केवळ नमस्कारावर काम भागते. असे नेहमी घडते अशी माहिती याच परिसरात हातगाडी चालवणाऱ्या बिरजू गुप्ता यांनी दिली. विमल बिडवे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा एपीएमसी) मी स्वतः नव्याने रुजू झालेले असून या संदर्भात योग्य ती पाऊले उचलत कारवाई केली जाईल. सर्वांना कायदा समान असून नियमबाह्य वाहन लावणे, चालवणे, याच्यावर कारवाई करण्यात येईल.