पनवेल : कळंबोली जंक्शनवरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी मुंब्रा-पनवेल महामार्गावरील नावडे या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आला असून तो नुकताच खुला करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली आहे. मात्र रोडपाली जंक्शनवरील वाहतूक कोंडीचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वाहनांची ताटकळ सुरू आहे.

या पुलामुळे नावडेफाटा व नावडे गाव या दोनही ठिकाणचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे. मात्र या पुलावरून भरधाव वाहने रोडपाली जंक्शन येथे आल्यानंतर त्यांना थांबावे लागत आहे. सध्या रोडपाली जंक्शन येथे फूडलँड कंपनीसमोर लोखंड पोलाद बाजारात जाण्यासाठी एक मार्गिका ठेवण्यात आली आहे. याच मार्गिकेचा वापर थेट कळंबोली सिग्नल येथे जलदगतीने पोहचण्यासाठी केला जातो. तसेच फूडलँड उड्डाणपुलावर वाहने कोंडीत अडकल्याचे पाहून विरुद्ध दिशेने पुलावरून प्रवास करून थेट रोडपाली जंक्शनपर्यंत पोहचण्यासाठी बेकायदा प्रवास करीत आहेत. यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

रोडपाली जंक्शन येथे नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या मार्गावरून येणारी वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने सुमारे दोनशे ते अडीचशे अवजड वाहने याच मार्गाचा वापर करीत आहेत.  कामोठे येथील दोनशे रुपयांचा टोल चुकविण्यासाठी वाहनचालक या मार्गावरून थेट कळंबोली सिग्नलपर्यंतचा प्रवास करीत आहेत.

जेएनपीटीकडे जाणाऱ्या सिग्नलची वेळ ८० सेकंदाची आहे. यावेळेत १५ ते १६ अवजड वाहने जाऊ शकतात. नावडे व रोडपाली येथून वाहने आल्यास त्यांना कळंबोली सिग्लनवर अजून काही वेळ थांबावे लागत आहे. रोडपाली सिग्नलवर सर्वाधिक कोंडीचे कारण हे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे ही समस्या वाढली आहे. टोलनाका चुकविण्यासाठी ही वाहने शीव पनवेल महामार्गावरून रोडपाली जंक्शन येथून थेट पुण्याकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गावर चढण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात.

मुंब्रा -पनवेल महामार्गावरील तळोजा नोडमधील १०२ आरएएफ कँपसमोरील सिग्नल, नावडे फाटा, रोडपाली सिग्नल व कळंबोली सर्कल ही मुख्य वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत. सध्या नावडे फाटा व गाव येथील उड्डाणपुलामुळे कोंडी काही प्रमाणात  सुटेल मात्र तळोजा वसाहतीसमोरील सिग्नल व रोडपाली सिग्नलवरील ताण वाढला आहे. कळंबोली सर्कलबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कळंबोली सर्कलप्रमाणे रोडपाली सिग्नलचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आमदार  बाळाराम पाटील यांनी केली आहे.

नावडे येथील उड्डाणपूल वाहनांसाठी खुला झाल्याने रोडपाली सिग्नलवरील वाहतुकीचा ताण अजून वाढला आहे. हे खरे असले तरी येथे वाहतूक पोलीस कर्मचारी सदैव तत्पर असतात. रोडपाली जंक्शन येथे दिवसा पाच पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

 – निशिकांत विश्वकार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक विभाग

तळोजा औद्योगिक वसाहतीमधून थेट शीव-पनवेल महामार्ग

जोडला जावा. ही काळाची गरज आहे. रोडपाली येथील कोंडीमुळे इंधन व वेळेचे नुकसान होते. फक्त एक मिनिटाच्या प्रवासाला कधीकधी २० ते ३० मिनिटे ताटकळत राहावे लागते. अनेकदा वाहतूक नियमन पाळले जात नसल्याने येथे वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने चालवितात, यामुळे  कोंडीत भर पडते. फूडलँड उड्डाणपुलावरून थेट शीव -पनवेल महामार्गावर जाण्याची सोय हवी.

– संदीप डोंगरे, टीएमए कार्यकारिणी सदस्य

कोटनाका वाहतूक कोंडीचे नवे ठिकाण; बोकडविरा चारफाटा ते शेवा रस्ता वाहनांसाठी बंद

उरण : शहरात प्रवेश करण्यासाठी कोटनाका व चारफाटा अशी दोन प्रवेशद्वार असून उरण-पनवेल मार्गावरील बोकडविरा चारफाटा ते शेवा व उरण कोटनाका असे दोन मार्ग होते. मात्र सध्या रेल्वे मार्गामुळे बोकडविरा चारफाटा ते शेवा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या मार्गावरील सर्व वाहने कोटनाका मार्गे येत आहेत. त्यामुळे कोटनाका या प्रवेशद्वारावरील वाहतूक कोंडी वाढली आहे.

 या वाहतूक कोंडीकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक नियमित करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. उरण शहरात प्रवेश करण्यासाठी केवळ दोन मार्ग आहेत. यातील एक मार्ग बंद झाल्याने सर्वात जुने कोटनाका येथील एकच मार्ग उरला आहे. तर शेवा मार्गाने प्रवास करायचा असल्यास नवघर पुलावरून भेंडखळ, द्रोणागिरी नोड मार्ग वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. आधीच अरुंद असलेल्या उरण शहरातील कोटनाका येथे सातत्याने कोंडी होऊ लागली आहे.

यामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येणारी चारचाकी वाहने व त्यांच्यावरील कारवाईकडे होत असलेले दुर्लक्ष हे महत्त्वाचे कारणही पुढे येत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने याकडे लक्ष देऊन उरण शहरातील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांकडून केली जात आहे.

बाह्यवळणाची प्रतीक्षा

 उरणमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी पासून सिडको आणि नगरपरिषद यांच्याकडून बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. मात्र दोन दशकांपासून या मागार्ची प्रतीक्षा कायम आहे.