नवी मुंबई : शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास वाळू वाहून नेणाऱ्या डम्परचा अपघात झाल्याने शीव पनवेल वाहतूक सुरळीत होण्यास दुपारचे दोन वाजले. डम्परमध्ये ४० टन वाळू असल्याने डम्पर सहज बाजूला करणेही शक्य नसल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास एवढा कालावधी लागला.
शुक्रवारी सकाळी पनवेलहून-मुंबईकडे वाळू घेऊन जाणारा डम्पर वाशी पथकर नाक्याजवळील दुभाजकाला धडकला. डम्परमध्ये सुमारे ४० टन वाळूचे वजन असल्याने व धडक जोरदार बसल्याने डम्परच्या पुढील चाकाचा अॅकक्सल रॉड तुटला आणि एका बाजूचे चाक निखळले. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. ही वाहतूककोंडी सुमारे चार किलोमीटर अर्थात तुर्भेपर्यंत लांबली गेली होती.
वाहतूक पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या डम्पर चालकास तात्काळ वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले तर दुसरीकडे वाहतूक सुरळीत होण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला टोइंग व्हॅनद्वारे डम्पर बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आल्याने जेसीबी मशीनचा वापर केला. मात्र त्यातही फारसे यश न आल्याने शेवटी वाळू काढून डम्पर बाजूला केला व नंतर वाळू बाजूला केली, अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.
या अपघाताने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप झाला असून सकाळी राज्यभरातून मोठय़ा संख्येने वाहने मुंबईकडे येतात. त्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाल्यावरही पथकर मात्र चुकला नाही. पथकर नाक्यापासून ठरावीक अंतरापेक्षा अधिक अंतरापर्यंत वाहतूककोंडी झाली तर पथकर न घेता अगोदर वाहतूककोंडी सोडवली जाते. त्यासाठी पिवळय़ा रंगाची पट्टीही ओढली जाते. मात्र या ठिकाणी नियमांना हरताळ फासत पथकर वसुली अव्याहत सुरू होती. त्यामुळेही वाहतूककोंडी सुटण्यास उशीर होत होता अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांनी दिली. पथकर नाक्यावर वादही झाले.