scorecardresearch

बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडी

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

अपुऱ्या पोलीस बळामुळे पनवेल महापालिका मुख्यालयासमोरच कोंडी

पनवेल : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र त्यावर काही प्रमाणात अमल झाला असला तरी अनेक सूचनांवर अजूनही गांभीर्याने विचार झालेला नाही. अपुरे पोलीसबळ आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे पालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोरच वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील रस्ता अरुंद असून त्याचे रुंदीकरण करावे. तसेच एकतर्फा वाहने उभी करण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करावी आणि या प्रसिद्धीच्या नोटिसीनंतर हरकती व सूचना मागवून त्यावर रितसर सुनावणी घेतल्यावर संबंधित रस्त्यावर सम-विषम वाहने उभी करण्याचे फलक लावावेत, अशी संपूर्ण व्यवस्था स्वामी नित्यानंद मार्गावरील गोखले सभागृहासमोरील चौकात पालिका व पोलीस यांच्या विभागाने पूर्ण केली आहे.

 येथे सम-विषम वाहने उभी करण्याच्या तारखांचे फलक व ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. तरीही काही बेशिस्त वाहनचालक याच फलकांखाली वाहने उभी करून केशकर्तनालयात जाऊन तासनतास बसत असल्याच्या तक्रारी येथील पादचाऱ्यांनी केल्या. काही बेशिस्त वाहनचालकांनी त्याच चौकातील दुसऱ्या बाजूला झाडाची सावली पाहून स्वत:चे वाहन नियमितपणे उभे करत असल्याची तक्रार येथील दुकानदारांकडून केली जात आहे. यामुळे पालिकेसमोरील स्वामी नित्यानंद मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याला वाहतूक कोंडी होते. विशेष म्हणजे महामार्गावर या कोंडीचा सर्वाधिक त्रास नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बससेवेला होतो. हलक्या वाहनांचे वाहनचालक स्वत:चे वाहन मागे घेण्यास तयार नसल्याने अनेक प्रवासी घेऊन चाललेल्या बसला माघारी प्रवास करून हलक्या वाहनांना वाट मोकळी करून द्यावी लागते.

पोलीस मदतनीसाअभावी कोंडी

पनवेल वाहतूक पोलीस हे महामार्गावर सिग्नल तोडणाऱ्या वाहनांसाठी तसेच टोईंग व्हॅनवर नेमले असल्याने शहरातील कोंडीसाठी नो पार्किंगच्या फलकाखाली व बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आहे. पालिकेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना मदतनीस म्हणून वॉर्डनची नेमणूक करण्याची निविदा जाहीर केली आहे. मात्र संबंधित वॉर्डन म्हणजेच पोलिसांच्या मदतनीस येईपर्यंत या वाहनांच्या कोंडीत पनवेलकर सापडले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic jams indiscipline conflict municipal corporation headquarters insufficient police force ysh

ताज्या बातम्या