नवी मुंबई : कोपरखैरणे, घणसोली भागांत शाळा सुटण्याच्या वेळेस सर्वच शाळांच्या समोरील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यातून सुटका करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला असून शाळा प्रशासनात जनजागृती केली आहे. शाळा सोडताना शाळेसमोरील रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाय सुचवले आहेत. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणारा कोपरखैरणे आणि घणसोली येथे शाळा सुटण्याच्या वेळेस बहुतांश शाळांच्या परिसरांत प्रचंड वाहतूक कोंडी होते. अनेक पालक चारचाकी-दुचाकींचा आणतात. त्याचबरोबर शाळेच्या बसदेखील शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत थांबतात. हेही वाचा.सिडकोच्या गृह सोडतीपूर्वीच समाजमाध्यमांवर फसव्या जाहिरातींचा गैरवापर चिंचोळे रस्ते, त्यात दोन्ही बाजूला वाहने उभी केल्यामुळे शाळांच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी प्रत्येक शाळेसमोर वाहतूक पोलीसच तैनात करण्यात आले होते. मात्र शिक्षित असूनही दोनच मिनिटे म्हणत बेशिस्तपणे दुचाकी, कार अशी वाहने उभी करून ५ ते २० मिनिटे, कधीकधी अर्धा तास आपल्या पाल्यांची वाट पाहत पालक उभे असतात. यात महिला पालकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. वाहतूक पोलिसांनी कितीही समजावून सांगितले तरी दोनच मिनिटे म्हणत पालक उभे राहतात. ती परिस्थिती कायदा शिकवत दंड आकारण्याची नसते तर वाहतूक पटापट सुरळीत करण्याची असते, त्यामुळे वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते, अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दिली. हेही वाचा.एपीएमसी’तील कचरा समस्या मार्गी, १२५ कोटींच्या मंजूर निधीतून घनकचरा व्यवस्थापन करण्याचा प्रशासनाचा निर्णय कोपरखैरणे वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी पुढाकार घेत सोमवारी कोपरखैरणे येथील सेंट मेरी शाळेत कोपरखैरणे, घणसोली भागांतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी यांची बैठक घेतली. शाळा सुटताना व भरताना होणारी वाहतूक कोंडी यावर कसा मार्ग काढता येईल याविषयी चर्चा करून त्यानंतर शाळेच्या वाहतूक संदर्भातील अडचणींवर कसा मार्ग काढता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. सर्वांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत याबाबत प्रबोधन केले. या वेळी ३८ शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्कूल बस, स्कूल व्हॅन युनियनचे पदाधिकारी हेदेखील उपस्थित होते. पालकांनी कसे वाहन उभे बस कशा पद्धतीने उभ्या कराव्यात जेणेकरून अन्य वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, शालेय वर्ग टप्प्याटप्प्याने सोडावे, शाळा प्रशासनातर्फे काही स्वयंसेवकांची नेमणूक शाळेचे पालक आणि बस चालकांशी समन्वय साधत वाहतूक नियंत्रित करावी असे अनेक उपाय यावेळी सुचवण्यात आले, अशी माहिती भिंगारदिवे यांनी दिली.