मासळीऐवजी जेली फिश जाळ्यात

सुमद्रातील वादळ शांत झाल्यानंतर आता कुठे खोल समुद्रात मासेमारी सुरू झाली आहे.

मच्छीमारांसमोर नवे संकट; फेरी वाया जात असल्याने चिंता

उरण : सुमद्रातील वादळ शांत झाल्यानंतर आता कुठे खोल समुद्रात मासेमारी सुरू झाली आहे. मात्र मच्छीमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. जाळ्यात मासळीपेक्षा जेली फिशच अधिक अडकत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच हे विषारी असल्याने खलाशांनाही बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जाळ्यांचंही नुकसान होत असल्याची व्यथा उरणमधील मच्छीमारांनी व्यक्त केली.

दोन महिन्यांची पावसाळी बंदी आणि त्यानंतर वारंवार वातावरणात झालेल्या बदलांमुळे मासेमारी करता आली नाही. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात आहे. त्यात हे नवे संकट आल्याची माहिती करंजा येथील मच्छीमार विनायक पाटील यांनी दिली.

मध्यम आणि मोठय़ा मच्छीमार बोटीतून मासेमारी करण्यासाठी एका फेरीसाठी डिझेल, बर्फ तसेच इतर कामांसाठी २ ते ५ लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. त्याकरीता किमान चार दिवस लागतात. यासाठी होणारा खर्च हा सध्या मासळीपेक्षा अधिक प्रमाणात मिळत असलेल्या जेली फिशमुळे वाया जात आहे. मासळी एक ते दोन टन व जेली फिश चार ते पाच टन मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मच्छीमारांची फेरी वाया जात आहे.

जेली फिशच्या अति वजनामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान होतआहे. याचाही फटका मच्छीमारांना बसत आहे. सापडलेल्या मासळीतून जेली फिश वेगळे करावे लागत आहेत. त्यांचे विषारी काटे खलाशांना लागण्याचा धोका वाढल्याचे नित्यानंद कोळी यांनी सांगितले. अशा प्रकारच्या संकटाचा सामना करीत सध्या मच्छीमार मासेमारी करीत असल्याने शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणीही कोळी यांनी केली.

किनाऱ्यावर येण्याचा धोका

जेली फिश किनाऱ्यावर आल्याने नागरिकांसमोर यापूर्वीही अनेकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आताही समुद्रातील वाढते प्रमाण पाहता जेली फिश किनाऱ्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे येथील मच्छीमारांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Trap jellyfish instead fish ysh

Next Story
उरणमध्ये कामगारांचा मोर्चा
ताज्या बातम्या