‘जम्बो’ रुग्णालयात उपचार एकवटणार

करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पालिकेचे हक्काचे रुग्णालय नसल्याने पनवेलमधील करोनाबाधितांची उपचारासाठी मोठी परवड झाल्याचे पाहावयास मिळाले होते.

उपजिल्हा रुग्णालय इतर आजारांसाठी खुले करण्याचे नियोजन

पनवेल : करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पालिकेचे हक्काचे रुग्णालय नसल्याने पनवेलमधील करोनाबाधितांची उपचारासाठी मोठी परवड झाल्याचे पाहावयास मिळाले होते. आता करोनाची तिसरी लाट मोठी असण्याची शक्यता असताना पनवेलकरांसाठी सिडकोने कळंबोलीत जम्बो रुग्णालय उभारले असल्याने दिलासा मिळणार आहे. हे रुग्णालय पुढील आठ दिवसांत सुरू करण्याचे संकेत असून या ठिकाणी पनवेलमधील करोना उपचार एकवटणार आहेत.

कळंबोली येथील केंद्रीय कापूस प्राधिकरणाच्या गोदामात हे ६६५ खाटांचे जम्बो करोना रुग्णालय उभारले असून ते सुरू झाल्यानंतर कळंबोली वसाहतीमधील ७२ खाटांचे करोना रुग्णालय आणि पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील १०० खाटांचे करोना रुग्णालयातील करोनाबाधितांना टप्प्याटप्प्याने या जम्बो रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यामुळे एकाच छताखाली पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर व आरोग्यसेवकांना रुग्णांवर लक्ष्य केंद्रित करता येणार असून रुग्णांना सुविधा देणे सोयीचे होणार आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात सध्या ६५ हजारांवर करोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. १३२० जणांचा पालिका क्षेत्रात करोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात सध्या ५०० रुग्ण करोना साथरोगावर उपचार घेत आहेत. त्यामुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या असून त्यामध्ये कळंबोली येथील सीसीआय गोदामातील जम्बो करोना रुग्णालयात बालकांसह सर्वच वयांतील रुग्णांना उपचार मिळण्याचे नियोजन पालिका प्रशासन व सिडकोने केले आहे.

पालिका क्षेत्रातील तीन लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याकडे पालिकेची वाटचाल सुरू आहे. पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सध्या ५० पेक्षा कमी करोनाबाधितांवर उपचार दररोज दिले जातात. उपजिल्हा रुग्णालय हे करोना रुग्णालय म्हणून रायगड जिल्ह्य़ात सर्वात प्रथम घोषित करण्यात आले. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना करोनाव्यतिरिक्त इतर आजारांसाठी खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय नाही. नागरिकांना स्वखर्चाने वैद्यकीय उपचाराचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व पालिकेच्या आरोग्य विभागासमोर तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात इतर आजारांवर उपचारासाठी खुले करण्याची मागणी होत आहे.

पालिका पुढील काही दिवसांत कळंबोली येथील ७२ खाटांचे रुग्णालय आणि पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील सेवांविषयी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. जम्बो करोना रुग्णालयातील तिसऱ्या लाटेत क्षमता वाढल्यास कळंबोली येथील ७२ खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा पर्याय पालिकेच्या हाती राहील.

जम्बो रुग्णालय पालिकेने हाती घेतल्यानंतर तेथील वैद्यकीय सेवासुविधा सुरळीत झाल्यावर पनवेलकरांसाठी आणखी काही वैद्यकीय सेवा सुरू करण्याचे नियोजन पालिका करीत आहे. पालिकेची पहिली प्राथमिकता जम्बो कोविड सेंटर चालविण्याची आहे. पालिका क्षेत्रातील अत्यल्प उत्पन्न गटातील व गरजूंना तातडीने इतर आजारांवर वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी नियोजन सुरू आहे. कळंबोली येथील ७२ खाटांचे रुग्णालय व शहरातील उपजिल्हा रुग्णालयातून त्या सेवा कशा देता येतील याविषयी नियोजन करण्यात येत आहे.

– गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Treatment concentrated jumbo hospital ssh

ताज्या बातम्या