दिवसभरात ३० मिमी पावसाची नोंद; साथीचे आजार बळावण्याचा धोका असल्याने पालिकेकडून तयारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शहरात पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने मंगळवारी नवी मुंबईकरांची चांगलीच त्रेधा उडवून दिली. शहरात एकूण ३० मिमी पाऊस पडल्याची नोंद असून कोपरखैरणे व बेलापूरमध्ये झाडे कोसळल्याची घटना घडली आहे.

पावसामुळे पाणी साचल्याच्या घटना नाहीत पण उंचसखल भागात काही ठिकाणी पाण्याची तळी तयार झाली होती. हा पाऊस बुधवारी देखील पडणार असल्याने पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. शेतीपिकांचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने  या पावसाचा परिणाम भाज्या व पालेभाज्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. मोकळ्या मैदानात पार पडणाऱ्या लग्न सोहळ्यांवर पावसाने पाणी फेरल्याने वऱ्हाडी मंडळीची निराशा झाली.

करोनाच्या ‘ओमायक्रॉन’मुळे भीतीचे वातावरण असताना या अवकाळी पावसाने रोगराई वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. करोनाची साथ आणि अवकाळी पाऊस या दोन्ही बाबी संसर्गाला पूरक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून घरोघरी चाचण्या व लसीकरणावर भर दिला जाणार आहे. नवी मुंबईत मंगळवारी पहाटेपासून ३० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. अचानक पडणाऱ्या या पावसाने नोकरदारांची तांराबळ उडाल्याचे दिसून येत होते. भर पावसात छत्रीशिवाय बाहेर न पडणारे चाकरमानी मंगळवारी छत्रीच नसल्याने बराच काळ अडकून पडले होते. संध्याकाळी कार्यालये सुटल्यानंतरही पाऊस पडत असल्याने घरी भिजत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत होते.

तुळसी विवाह झाल्यानंतर लगीनसराई सुरू झाली असून मंगळवारी अनेक मुहूर्त होते. नवी मुंबईत आगरी-कोळी समाज मोठय़ा प्रमाणात असल्याने घराजवळील मोकळ्या जागेत लग्न सोहळे करण्याचे प्रमाण जास्त आहे. अवकाळी पावसाने या लग्नांसाठी टाकण्यात आलेल्या मंडपांचे नुकसान झाले. बंद सभागृहात असलेल्या लग्न सोहळ्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. लग्नानंतर निघणाऱ्या मिरवणुका पावसामुळे रद्द कराव्या लागलेल्या आहेत. पाऊस आणखी दोन ते तीन दिवस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ओमायक्रॉन करोना संर्सगाची भीती आणि अवकाळी पाऊस यामुळे अनेक नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यांची लागण झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शहरात मलेरिया, डेंगी, टायफाईड हे आजार पसरण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

पनवेल, उरणमधील शेतीला फटका

पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसणार असून पनवेल, उरण या भागात पावसाळ्यानंतर काही आंतरपिके शेतकरी घेत असतात. यात भाज्यांचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी भागात ही पिके घेऊन उदरनिर्वाहासाठी हातभार लावला जात असल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. मुंबई महानगर प्रदेशाला भाजीपुरवठा करणाऱ्या पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातही या पावसाने हजेरी लावल्याने येत्या काळात भाज्या आणखी महागण्याची शक्यता आहे. टोमॅटोच्या उत्पन्नावर तर संक्रात ओढवली आहे. अशा अवकाळी पावसाने पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे एपीएमसीतील आवक यानंतर कमी होण्याची शक्यता आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tremble untimely rains problems ysh
First published on: 02-12-2021 at 01:11 IST