scorecardresearch

उरणच्या रानसई, चिरणेर परिसरातील आदिवासी पाडे दुर्लक्षित

रानसई धरणाच्या उभारणीसाठी येथील आदिवासींच्या जमिनी संपादीत करून त्यांना विस्थापित करण्यात आले आहे.

पाण्यासाठी वणवण, ना रस्ते ना वीज

उरण : उरण परिसराचा झपाटय़ाने विकास होत असताना रानसई धरण पाणलोट क्षेत्रातील सहा आदिवासी पाडे व चिरणेर परिसरातील पाच वाडय़ा आजही दुर्लक्षित आहेत. विकासासाठी महत्त्वाचे असलेले पाणी याच आदिवासींच्या जमिनीवर बांधलेल्या धरणातून दिले जात आहे. मात्र तेथील बांधव तहानलेले आहेत. वनविभागाच्या अडथळयामुळे ना चांगले रस्ते होऊ शकले, ना वीज मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही हे आदिवासी बांधव पारतंत्र्य अनुभवत आहेत.

विशेष म्हणजे हे आदिवासी पाडे चिरनेर ते पनवेल या मुख्य मार्गापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत विकास पोहचत नसल्याचे खंत त्यांना आहे. उरण तलुक्यात पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग आहेत. पूर्व भाग हा ग्रामीण म्हणून ओळखला जात आहे. या भागामध्ये डोंगर भागात आदिवासी वाडय़ा वसलेल्या आहेत.

पुनाडेपासून ते जांभुळपाडा रानसई परिसरात आदिवासी वाडय़ा आहेत.  या आदिवासी वाडय़ांमधील रानसई ग्रामपंचायतीत परिसरामध्ये सहा आदिवासी ठाकूर वाडय़ा आहेत. खैरकाठी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी,

सागाची वाडी, खोंडय़ाची वाडी, भुऱ्याची वाडी असून १२७६ इतकी लोकसंख्या आहे. त्यामधील ८२५ पेक्षा जास्त मतदान आहे.  या पाडय़ापर्यंत जाण्यासाठी पनवेल तालुक्यातून रस्ता आहे आणि उरणच्या टाकीगाव येथूनही रस्ता आहे. शासनाच्या मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता मंजूर आहे परंतु वनविभागाच्या खोडय़ामुळे फक्त खडीकरण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. भाजीपाला पिकवून उदरनिर्वाह हे आदिवासी बांधव करतात. मात्र त्यांना भाजीपाला वाहतुकीसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. रानसई धरणाच्या उभारणीसाठी येथील आदिवासींच्या जमिनी संपादीत करून त्यांना विस्थापित करण्यात आले आहे. या पाडय़ांच्या उशाशी म्हणजे काठावर धरण आहे. या धरणातील थेंबभर ही पाणी त्यांना मिळत नाही. त्यामुळे येथील आदिवासींना विहिरीतील पाणी उपसा करून त्याचा पुरवठा केला जातो. एका कंपनीने येथील पाच वाडय़ांमध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र बसविले आहेत. ओएनजीसीच्या सहाय्याने सोलरद्वारे पाणी ही विहिरीतून पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यत पोचविले गेले आहे. परंतु विहरीतच पाणी शिल्लक राहत नसल्याने त्यांची पाण्यासाठीची वनवण आजही थांबलेली नाही. विजेचेचा पुरवठा होत असला तरी तो अनियमित आहे. तर दाब कमी असल्याने विजेची अनेक उपकरणे असूनही वापरता येत नाहीत. 

 चिरनेर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाच वाडय़ा आहेत. त्यामधील केलाचा माळ ही एक वाडी आहे. ४५ कुटुंब वास्तव्य करीत आहेत १७५  लोकसंख्या आहे. या वाडीसाठी जाण्यासाठी रस्ता मंजूर होऊनही पूर्णत्वास आलेला नाही. त्यामुळे त्यांची पायपीट आजही सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. हातपंप, विहीर आहे पण त्यांना पाणी नाही. उन्हाळय़ात ट्रॅकरद्वारे पाणी मागवावे लागत आहे. चार चार दिवस वीज नसते. येथील चांडायली आदिवासी वाडीवर तर वीज आलीच नाही. हाताला काम मिळत नसल्याने घरखर्च कसा भागवायचा हा प्रश्न तर आहेच, शिवाय सुविधाही मिळत नसल्याने आंम्ही जायचे कसे हा त्यांचा प्रश्न आहे.

रानसई धरणातून येथील पाडय़ावर पाणी पुरवठा होत नाही. तर येथील नागरिकांनी हेटवणे धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी मिळवा अशी त्यांची मागणी असल्याचे एमआयडीसीचे उप अभियंता रवींद्र चौधरी यांनी सांगितले.

रानसईतील सहा पाडय़ांवर जाण्यासाठी उरणमधील टाकी भोमवरून सात किलोमीटर अंतर आहे तर मुंबई- गोवा महामार्गावरून चार किलोमीटर. मात्र या दोन्ही मार्गावर कच्चे रस्ते आहेत. त्यावर वाहन चालवता येत नाही. विहिरीतून पाणी पुरवठा होतो. वीज पुरवठाही अनेकदा खंडित होत असतो. – विलास म्हात्रे, ग्रामसेवक, रानसई

आमच्या वाडीत वीज आम्हाला कधीच बघायला मिळाली नाही. वाडीवर शाळाही नाही. वर्षांनुवर्षे विहिरीचे पाणी प्यावे लागत आहे. आम्हाला या सुविधा मिळाल्या नाही तर आम्ही यापुढे मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकणार आहोत.

 -भरत कातकरी, अध्यक्ष, चांडायली वाडी

आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापैकी पाणी आणि रस्ते तरी शासनाने लवकरात लवकर बनवावे. आमच्या मुलांना माध्यमिक शिक्षण मोफत मिळावे. – सुधाकर कातकरी, रहिवासी, केल्याचा माळ

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tribal pades in ransai chirner area of uran ignored zws

ताज्या बातम्या