वनजमिनींचा गेल्या दहा वर्षांपासून पेच कायम

नवी मुंबई : शहरात परवडणाऱ्या घरांचे मजले उभे राहत आहेत, मात्र येथील काही आदिवासी कुटुंबे आजही मोडकळीस आलेल्या झोपडीत वास्तव्य करीत आहेत. नवी मुंबई महापालिकेने घरकुल योजनेअंतर्गत बहुतांश जणांना हक्काचे पक्के छप्पर दिले आहे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे अनेक जण या योजनेतील सवलतींचा लाभ घेऊ शकलेले नाहीत.

नवी मुंबईत आठ विभाग असून प्रत्येक विभागात ३ ते ४ आदिवासी पाडे आहेत. एकूण १९ आदिवासी पाडे शहरात असून ३ हजार ७३ इतकी लोकसंख्या आहे. यातील अनेकांना आजही पक्के घर मिळालेले नाही.

नवी मुंबई महापालिकेने या आदिवासींसाठी घरकुल योजना सुरू केली. यात २००५ मध्ये पावणे आदिवासी वारली पाडय़ातील नागरिकांना वाल्मिकी आवास योजनेतून ७५ कुटुंबाना घरकुल दिले तर २६ कुटुंबाना लाभ मिळालेला नाही. श्रमिक नगरमध्ये १७२ घरकुले देण्यात आली आहेत. तर आता १४ वर्षांनंतर खैरणे कातकरी पाडा येथे ५९ आदिवासी कुटुंबांना ५९ घरकुले बांधून दिली आहेत. अडवली भुतावलीत २२ घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र आजही काही ठिकाणी विखुरलेले आदिवासी निवाऱ्यापासून वंचित आहेत. पक्के घर तर नाहीच शिवाय पाणी, शौचालय, शिक्षण या सुविधांचा देखील अभाव आहे.

खैरणे वारलीपाडा, चिंचपाडा, गवतेवाडी, ऐरोली नाका यातील काही आदिवासी पाडे हे वन विभागाच्या जागेवर वसलेले असल्याने जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे घरकुल योजना राबवता येत नाही.  वन विभागाने सर्वेक्षण करून  प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहिजे. इतरही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास शासन कमी पडत असल्याचे माजी नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी सांगितले.