नवी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचा फटका नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील व्यापाऱ्यांना बसला आहे. दोन दिवसांच्या विशेष कारवाईत कृत्रिमरीत्या पिकवलेले ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचे आंबे आणि सुमारे साडेचार लाख रुपयांचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात ३७ जणांना अटक करण्यात आली असून ३१ आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.

मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३० आणि ३१ मे रोजी एपीएमसी बाजारपेठेसह नवी मुंबई ठाणे परिसरात अचानक धाडी टाकल्या. उन्हाळ्यात वाढलेल्या आंब्याच्या मागणीचा गैरफायदा घेत काही व्यापारी फळांवर थेट इथिलिनसदृश स्प्रे फवारून ती कृत्रिमरीत्या पिकवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तपासणीदरम्यान अशा प्रकारे आंबे पिकवणाऱ्या तीन मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ३,४५३ किलो आंबे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रेचा वापर करण्यास बंदी आहे. फळे पिकवण्यासाठी केवळ मान्यताप्राप्त इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. जप्त आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांविरोधात पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मे या कालावधीत गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधातही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ३६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत आतापर्यंत ३७ जणांना अटक करण्यात आली असून गंभीर नियमभंग करणाऱ्या ३१ आस्थापनांना सील करण्यात आले आहे. एपीएमसीसारख्या मोठ्या घाऊक बाजारपेठेत सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रशासनाने थेट कारवाई केल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक

भेसळयुक्त अथवा प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत तक्रार नोंदविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांना लेखी तक्रारही नोंदविता येणार असून अशा गैरप्रकारांविरोधात पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.