नवी मुंबई : बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या खाद्यपदार्थांची मुदत संपल्यानंतरही त्यांना नव्या तारखांसह पुन्हा विक्रीयोग्य बनविण्याचा प्रकार तुर्भे औद्योगिक परिसरात उघडकीस आला आहे. पाकिटांवरील मूळ उत्पादन आणि मुदत समाप्तीच्या तारखा थिनरने पुसून त्यावर इंकजेट यंत्राच्या साहाय्याने नव्या तारखा छापल्या जात असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या कारवाईत आढळले. अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने करण्यात आलेल्या तपासणीत ४,९४२ कार्टन्समधील सुमारे ७५ लाख २१ हजार रुपयांचा संशयित खाद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेला २४ ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीमधील मे. साधना एंटरप्रायझेसच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. प्लॉट क्रमांक सी-४४९ येथील गोदामात खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील छापील माहितीमध्ये फेरफार केला जात असल्याचे आढळले. जुनी तारीख पुसल्यानंतर पुढील कालावधीतील उत्पादन आणि मुदत समाप्तीच्या तारखा छापल्या जात असल्याचा संशय आहे. काही पाकिटांवरील मूळ घटकांची माहिती आणि पोषणमूल्य झाकण्यासाठी स्टिकर्स लावण्यात आल्याचेही तपासात आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोदामातील साठ्याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीही सहभागी झाले. मोठ्या प्रमाणात माल असल्याने त्याचे वर्गीकरण आणि मोजदाद करण्यासाठी सलग काही दिवस तपासणी करण्यात आली. जप्त केलेल्या साठ्यात कुरकुरे, लेज, बिंगो, मॅगी नूडल्स, नॉर सूप, विविध मसाले, कसुरी मेथी, देगी मिरची, वाघ बकरी चहा, हेलमन्स मेयोनीज, तयार ग्रेव्ही तसेच थम्स अप आणि लिम्का यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. याशिवाय विना-लेबल सुकामेवा असल्याचेही तपासात आढळले.
गोदामात १८ निर्यातदारांचा मोठ्या प्रमाणातील माल असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी ११ निर्यातदारांच्या मालातील पाकिटांवरील तारखांमध्ये फेरफार झाल्याचा संशय असून, हा साठा जप्त करण्यात आला. गोदामातील उर्वरित मालाचीही तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे एकूण साठ्यापैकी नेमका किती माल मुदतबाह्य किंवा फेरफार केलेला आहे, हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी साधना एंटरप्रायझेसचे भागीदार जयप्रकाश संचतीराम सिंग (२७) आणि जया नवरंग बहादूर सिंग (२६) यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित निर्यातदारांच्या सूचनांनुसार मालावरील तारखांमध्ये बदल केला जात होता का, तसेच हा माल देशांतर्गत बाजारपेठेत किंवा परदेशात पाठविला गेला आहे का, याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. त्यामुळे या प्रकारामागे केवळ गोदामातील फेरफार आहे की त्याची व्याप्ती आणखी मोठी आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने मे. साधना एंटरप्रायझेसचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोदकुमार शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली.
तपासाचा पुढील महत्त्वाचा टप्पा आता जप्त मालाच्या पुरवठा साखळीचा आहे. तारखांमध्ये फेरफार केलेला माल यापूर्वी बाजारात पोहोचला आहे का, कोणत्या ठिकाणी पाठविला गेला आणि त्यामागे आणखी व्यापारी किंवा निर्यातदार सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
