नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांपासून रखडले असताना त्याचा फटका मात्र दररोज वाहनचालक आणि पादचाऱ्यांना बसत आहे. वाहतूक कोंडीसोबतच या परिसरात अपघातांची मालिकाही सुरू असून, नागरिकांच्या जीवितहानीनंतरही महापालिका प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. ठाणे-बेलापूर मार्गावर रेल्वे स्थानकासमोर रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. उड्डाणपुलाच्या कामातील दिरंगाईस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासह महापालिका आयुक्तांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील ठाणे-बेलापूर मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असताना अपूर्ण पुलामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत अपघातांचाही धोका वाढला आहे. आंदोलनादरम्यान शिवसेनेने या परिसरातील अपघातांची आकडेवारी मांडत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आतापर्यंत झालेल्या अपघातांत २३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे ५६ नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा दावा पक्षाने केला आहे. एवढी जीवितहानी होऊनही प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.
या उड्डाणपुलाच्या कामाचा कार्यादेश २०२२ मध्ये देण्यात आला होता. २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित मुदत उलटूनही काम अपूर्ण आहे. महावीर रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार कंपनीकडे कामाची जबाबदारी आहे. संबंधित कंपनीची आर्थिक परिस्थिती आणि काम पूर्ण करण्याची क्षमता याबाबत प्रश्न उपस्थित करीत कंत्राटदाराकडून काम होत नसेल, तर त्याला बदलण्यास प्रशासनाला अडचण काय, असा सवाल आंदोलकांनी केला. कंत्राटदाराच्या दिरंगाईचा फटका नागरिकांना बसत असताना प्रशासन त्याच्यावर ठोस कारवाई का करीत नाही, असा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला.
जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी या प्रकरणी महापालिका आयुक्तांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर नागरिकांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते, अशी भूमिका त्यांनी मांडली. अपघातांत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या नागरिकांना आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच कामातील दिरंगाईची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा नेते प्रवीण म्हात्रे यांनीही प्रशासनाला इशारा दिला. सध्याच्या कंत्राटदाराला बदलून सक्षम कंत्राटदाराची नियुक्ती करावी आणि उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नावर प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी त्यांनी केली. रास्ता रोकोदरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र, उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. रखडलेल्या कामाची जबाबदारी निश्चित करून कंत्राटदार बदलण्यापासून ते संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापर्यंतच्या मागण्यांवर पक्ष ठाम असल्याचे आंदोलनातून स्पष्ट करण्यात आले.
