नवी मुंबई : तुर्भे उड्डाणपुलाच्या उर्वरित भागांच्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची चाचपणी सुरू केली आहे. पाडकामामुळे ठाण्याकडून वाशीकडे जाणारी वाहतूक नेरुळ एलपी पुलाखालून वळविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने नेरुळ एलपी येथील दोन्ही दिशांचे बस थांबे ५० मीटर पुढे स्थलांतरित केले आहेत.

तुर्भे उड्डाणपुलाचे तीन भाग असून, पहिल्या भागाचे काम सुरू आहे. उर्वरित दोन भाग पाडल्यानंतर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही भागांचे पाडकाम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्ग आणि वाहतूक व्यवस्थेचा आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नेरुळ एलपी परिसरावर वाहतुकीचा संभाव्य ताण लक्षात घेऊन परिवहन उपक्रमाने बस थांब्यांच्या ठिकाणी बदल केला आहे. पनवेलच्या दिशेने जाणारा बस थांबा सध्याच्या ठिकाणापासून ५० मीटर पुढे, तर वाशीकडे जाणारा बस थांबाही सुमारे ५० मीटर पुढे स्थलांतरीत केला आहे. नवीन ठिकाणी खांब उभारण्यात आले आहेत. तुर्भे, आसुडगाव आणि घणसोली आगारातील चालक-वाहकांना याच नवीन ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुलाच्या उर्वरित दोन भागांचे पाडकाम सुरू झाल्यानंतर वाहनांची वाहतूक कोणत्या मार्गाने वळवायची, याचा निर्णय वाहतूक विभागाच्या नियोजनानंतर होणार आहे. त्यामुळे सध्या बस थांबे स्थलांतरित करून सार्वजनिक वाहतुकीची पूर्वतयारी करण्यात आली असून, पर्यायी मार्ग निश्चित झाल्यानंतर वाहतुकीतील पुढील बदल स्पष्ट होणार आहेत.

तुर्भे उड्डाणपुलाचा संबंधित भाग जीर्ण झाल्याने तो पाडणे आवश्यक आहे. परवानग्या मिळविण्याचे काम सुरू असून, पाडकामासाठी यंत्रसामग्रीही तयार ठेवण्यात आली आहे. उर्वरित दोन भाग पाडण्यापूर्वी वाहतूक विभागाकडून नियोजन करण्यात येणार आहे.- साजिल पिरजादे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निवेदन प्राप्त झाले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन सुरू असून, परिवहन उपक्रमालाही सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत वाहतुकीचे नियोजन तपासून उड्डाणपूल पाडण्यास मंजुरी देण्यात येईल. त्यापूर्वी वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. राहुल खाडे, उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई</strong>

टीप : उड्डाणपूल दिलेले क्रमांक पुढील प्रमाणे
१. पुणे ते मुंबई

२. ठाणे ते मुंबई

३. मुंबई ते पुणे

क्रमांक १ चे काम सुरू आहे. उर्वरित दोन उड्डाणपुलाचे काम परवानग्या मिळाल्यावर सुरू होईल.