नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर सानपाडा-तुर्भे परिसरात होणारी वाहतूकीची कोंडी कमी व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्वदीच्या दशकात उभारलेला उड्डाणपूल अखेर जमिनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उभारल्यापासूनच या पूलाच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले. दरम्यानच्या काळात महामार्गाचे रुंदीकरण, काॅक्रिटीकरण झाले तरीही दरवर्षी खड्डेग्रस्त होणाऱ्या या पूलाचे दुखणे काही थांबले नाही. उभारणीनंतर दहा वर्षातच या पूलाला भगदाड पडल्याने तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि सार्वजिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांनी या पूलाची पहाणी करुन बांधकामाच्या चौकशीचे आदेशही दिले होते.

दरम्यान खड्डे दुरुस्तीवर दरवर्षी होणारा खर्च आणि पूलाच्या सदोष बांधणीच्या तक्रारी लक्षात घेऊन बांधकाम विभागाने हा पूल पाडून त्याठिकाणी नव्या पूलाची बांधणी करण्याचा निर्णय पक्का केला आहे. तुर्भे उड्डाणपूल हा शीव-पनवेल महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलदरम्यान दररोज मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक या मार्गावरून होते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांतून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने या मार्गावरील वाहतूकभार आणखी वाढतो. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्याची स्थिती आणि वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. १९९०च्या दशकात या पूलाची बांधणी सुरु करण्यात आली.

साधारणपणे १९९४ मध्ये हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. मात्र बांधणीनंतर काही वर्षातच या पूलाच्या दर्जाविषयी वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले. पुलाच्या डेकवर पोकळ्या निर्माण होणे, रस्त्यावर खड्डे पडणे, विस्तार सांध्यांमध्ये बिघाड होणे आणि काँक्रीटच्या संरचनेची झीज होणे, अशा समस्या वेळोवेळी निदर्शनास आल्या. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध टप्प्यांवर दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे करण्यात आली. मात्र, विशेषतः पावसाळ्यात पुलावर पुन्हा खड्डे पडत असल्याने दुरुस्तीची ही मालिका कायम राहिली.

खड्डे मालिका संपलीच नाही

पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढत होता. खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालकांना अचानक दिशा बदलावी लागत असल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. वाहनांचे टायर, चाके तसेच सस्पेन्शनचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही वारंवार करण्यात आल्या. दुरुस्ती केल्यानंतर काही कालावधीतच रस्ता पुन्हा खराब होत असल्याने केवळ डागडुजीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत होती.

या पार्श्वभूमीवर तुर्भे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, उड्डाणपुलाचे तीन भाग असून ते टप्प्याटप्प्याने पाडण्यात येणार आहेत. पहिला भाग पाडून त्याच्या जागी नवीन भाग उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. उर्वरित दोन भाग पाडल्यानंतर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले जात आहे.

उड्डाणपूलाचा पहिला भाग पाडून त्या जागी नवीन भाग उभारण्याचे काम सुरू आहे. उर्वरित दोन भाग पाडल्यानंतर वाहतुकीचे नियोजन कसे करायचे, याबाबत वाहतूक विभागासोबत चर्चा सुरू आहे. वाहतूक पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसरा आणि तिसरा भाग पुर्णपणे पाडण्यात येईल. साजिल पिरजादे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टीप : उड्डाणपूल दिलेले क्रमांक पुढील प्रमाणे

१. पुणे ते मुंबई

२. ठाणे ते मुंबई
३. मुंबई ते पुणे

क्रमांक १ चे काम सुरू आहे. उर्वरित दोन उड्डाणपुलाचे काम परवानग्या मिळाल्यावर सुरू होईल.